

नाशिक : टीम पुढारी
‘द्राक्षपंढरी’ म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. देशातून निर्यात होणार्या एकूण 343982 मेट्रिक टन (2023- 24) द्राक्ष निर्यातीपैकी महाराष्ट्राचा वाटा 80 टक्के, तर त्यातही नाशिक जिल्ह्याचा वाटा सुमारे 60 टक्के इतका आहे. मागील वर्षी एकठ्या नाशिकमधून 1.57 लाख टन द्राक्षांची विक्रमी निर्यात झाली होती. विशेषत: नाशिकच्या मातीतील द्राक्ष आपल्या विशिष्ट गोडीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात वेगळी ओळख निर्माण करून आहेत. असे असले तरी यंदा ‘द्राक्षपंढरी’ला नैसर्गिक संकटांनी वेढल्याचे चित्र आहे. यंदा मे महिन्यात सुरू झालेला पावसाळा दिवाळी उलटूनही सुरूच आहे. त्यातही सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने द्राक्षबागा अशरश: उद्ध्वस्त झाल्या आहेत. बागांची सद्यस्थिती पाहता यंदा जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनात तब्बल 30 ते 40 टक्क्यांची घट होण्याची शक्यता शेतकरी आणि कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केली आहे. यामुळे द्राक्ष बागायतदारांसह व्यापारी, वायनरी, बेदाणासह द्राक्षाशी संबंधित घटकांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडणार आहे.
लासलगाव : राकेश बोरा
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनाचे प्रमुख क्षेत्र म्हणून निफाड, दिंडोरी, कळवण, मालेगाव सिन्नर, येवला, नांदगाव, सटाणा, सुरगाणा या तालुक्यांची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वातावरणातील बदल तसेच अवकाळी व अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राच्या द्राक्षपट्ट्यावर मोठा परिणाम झाला आहे. यंदा सतत ओल्या हवामानामुळे बुरशीजन्य संसर्ग आणि असमान फळधारणाच होण्याची शक्यता असून, नाशिकच्या द्राक्षांच्या गुणवत्तेवर आणि निर्यात क्षमतेवरही परिणाम होणार असल्याचे स्पष्ट संकेत कृषितज्ज्ञांनी दिले आहेत.
द्राक्षपंढरी अर्थात नाशिक अलीकडच्या काळातल्या सर्वात वाईट हंगामातून जात आहे. मे महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागांना मोठा फटका बसला असून, कापणीच्या हंगामात लक्षणीय विलंब होण्याची शक्यता आहे. अतिपावसाने द्राक्षांच्या वाढीचे चक्रही विस्कळीत झाले आहे. दीर्घकाळ पडलेल्या पावसामुळे प्रतिएकरी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अनेक द्राक्षबागांना फुले कमी पडल्याने आणि द्राक्षांच्या घडांची अकाली गळती झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम संभवत आहे.
फळधारणेत घट
नाशिकच्या द्राक्षपट्ट्यावर वातावरणातील बदल तसेच अवकाळी व अतिवृष्टीमुळे यंदा सुमारे 15 टक्के बागांमध्ये फळधारणाच झालेली नाही. त्यामुळे भारताच्या द्राक्ष निर्यातीत महत्त्वपूर्ण योगदान देणार्या नाशिकच्या उत्पादकांसाठी ही चिंताजनक बाब आहे. आगामी कापणीचा हंगाम अनिश्चित असल्याने उत्पादकांनी मागील वर्षी अनुभवलेल्या संकटाची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. कारण देशांतर्गत पुरवठा आणि निर्यात दोन्हीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र अग्रस्थानी
देशातील एकूण द्राक्ष उत्पादनाच्या सुमारे 80 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. यात नाशिक, सांगली, सोलापूर, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यातही नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन घेतले जाते. पाठोपाठ कर्नाटकात 15 टक्के, तमिळनाडूतील दक्षिण भागात व्यापारी स्वरूपात द्राक्ष लागवड केली जाते.
लागवडीचे क्षेत्र असे...
2024 मध्ये महाराष्ट्रात अंदाजे 1.23 लाख हेक्टरी क्षेत्र लागवडीखाली होते देशातील सर्वात मोठा उत्पादक म्हणून 2023 -24 मध्ये सुमारे 67 टक्के उत्पादन महाराष्ट्रातून होते.
कर्नाटकात सुमारे 43 हजार हेक्टरी (2024 मध्ये) लागवडीखाली होते. कर्नाटक देशातील दुसरा मोठे उत्पादक राज्य असून, उत्पादनातील वाटा 28 टक्के (2023-24) इतका आहे.
कृषीतज्ज्ञ सचिन होळकर : बेदाणा उत्पादनाचे भविष्य अंधारात
लासलगाव : द्राक्षापासून बेदाणा निर्मिती उद्योगाकडे महाराष्ट्रात एक मोठा प्रक्रिया उद्योग म्हणून बघितले जाते. एखाद्या वर्षी द्राक्षाचे अतिरिक्त उत्पादन झाल्यास याच बेदाणा निर्मितीच्या उद्योगामुळे द्राक्ष बागायतदारांना द्राक्षाच्या विक्रीमध्ये थोडा आधार मिळतो. महाराष्ट्रातील काही भाग वगळता सर्वसाधारणपणे द्राक्ष काढणीच्या वेळेस निघणार्या मण्यांपासून तसेच कमी दर्जाच्या द्राक्षबागांपासून बेदाणा तयार केला जातो. मागील काही वर्षांमध्ये विशिष्ट कालावधीत एकाच वेळेस द्राक्षाचे अतिरिक्त उत्पादन झाले होते. अशा परिस्थितीमध्ये द्राक्षविक्री करणे अवघड झाले होते त्यावेळेस अनेकांनी द्राक्षापासून बेदाणे निर्मितीचा पर्याय निवडला. ज्यामुळे किमान शेतकर्यांना आधार मिळाला होता. यावर्षी छाटणी सुरू असलेल्या बागांना खूप कमी माल येत आहे त्याचप्रमाणे कमकुवत स्वरूपाचा माल निघत असल्याने एकंदर द्राक्षाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून द्राक्षाचे दर चांगले तेजीत राहतील. त्यामुळे द्राक्षाच्या बेदाणे निर्मितीवर याचा विपरीत परिणाम होईल. यंदा द्राक्ष बेदाणा निर्मितीसाठी मुबलक द्राक्ष आणि कमी दरात द्राक्ष मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने बेदाण्याचे उत्पादन घटणार आहे. यापुढे देखील या स्वरूपाचे अवकाळी पाऊस सुरू राहिल्यास द्राक्षाच्या दर्जावर त्याचप्रमाणे बेदाण्याच्या दर्जावर देखील याचा विपरीत परिणाम होणार आहे. सांगली तासगाव या भागातील फक्त बेदाणा निर्मितीसाठीच घेण्यात येणार्या द्राक्षाचे उत्पादन घटल्यास त्यांचादेखील बेदाणा उद्योगावर परिणाम होईल, अशी शक्यता कृषीतज्ज्ञ सचिन होळकर यांनी व्यक्त केली.
वणी : अनिल गांगुर्डे
वणी व परिसरात द्राक्षबांगांनाही अतिवृष्टी व सततच्या पावसाचा फटका बसला असून, सुमारे 200 ते 235 हेक्टर क्षेत्रातील बागा बाधित झाल्या आहेत. दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगाची छाटणी होऊन झाडांना कोंब फुटतात. त्यातूनच पुढे द्राक्षघडांची निर्मिती होते. मात्र, याच टप्प्यावर सततच्या पाऊस व ढगाळ वातावरणामुळे निर्मिती प्रक्रियेवरच परिणाम झाला आहे. कोंबांना ‘पोंग्या’ अवस्थेतून बाहेर पडण्यास अडचण येत आहेत. तर बाहेर आलेले कोंब आणि फुलोरे कुजत आहेत.
वातावरणाचा काय परिणाम होईल, हे आज सांगता येत नाही. परिसरात आज जरी नुकसान स्पष्टपणे दिसत नसले तरी प्रत्यक्षात 60 टक्क्यांहून अधिक बागांचे नुकसान झाले आहे. फुलोर्यात आलेल्या बागांतील फूलगळ मोठ्या प्रमाणात होत आहे.
विलास कड उपसरपंच, वणी
17 ते 18 एकर द्राक्षबागांपैकी केवळ 4 ते 5 एकरांवरील बाग टिकून आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन 30 टक्क्यांपर्यंतच राहण्याची शक्यता आहे. पुढील वातावरणीय बदल काय परिणाम करेल हे सांगता येत नाही.
बाळासाहेब घडवजे, वणी, शेतकरी
दरवर्षी द्राक्षबागेला एकरी सुमारे तीन लाखांचा खर्च येतो. मात्र, यावर्षी झाडांमधून कोंब फुटण्याचे प्रमाण फक्त 25 टक्क्यांपर्यंत आले आहे. जे काही घड बाहेर आले त्यातील बहुतेक कुजून गेले आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते.
सुनील बर्डे, वणी, शेतकरी
निफाड, नाशिक : किशोर सोमवंशी
‘हातात सोनं आलं होतं, पण पावसाने ते चिखलात गेलं’ ही हळहळ सध्या निफाड तालुक्यातील शेतकर्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसते. मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे तालुक्यातील सुमारे 23 हजार एकर द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. काही शेतकर्यांची वेदना इतकी खोल आहे की, त्यांनी स्वतःच्या हाताने कुर्हाड चालवून बागा तोडल्या आहेत.
श्रीरामनगरचे नवनाथ शिंदे यांनी दोन एकरांची बाग पूर्णपणे फेल झाल्याने त्यांनी बागेवर कुर्हाड चालवली. ते म्हणातात ‘प्रत्येक झाड माझ्या आयुष्याप्रमाणे होतं, पण आता फक्त माती आणि कर्ज उरलं आहे.’
रोगनियंत्रणावर भर देणे आवश्यक - अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 40 ते 45 टक्के द्राक्षबागा गंभीरपणे प्रभावित झाल्या आहेत. पंचनामे झाले आहेत आणि शेतकर्यांना तांत्रिक मार्गदर्शन देण्यात येत आहे. पुढील हंगामासाठी खरड छाटणी, मातीची निगा आणि रोगनियंत्रण यावर विशेष भर देणे आवश्यक आहे.
सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी, निफाड , नाशिक
त्याच गावातील संपत खताळे यांची दोन एकर बागही फेल झाली. त्यांनी मोठ्या कष्टाने व मेहनतीने बाग उभी केली होती, पण निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांचा खर्च वाया गेला. आताच्या परिस्थितीत बागेसाठी होणार्या खर्चामुळे तणाव आणि चिंता सतावत आहे. पुढील हंगामासाठी तयारीसाठी भांडवल कुठून उभं करायचं, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
नैताळे येथील काकासाहेब मोगल म्हणाले, ‘अडीच एकर बाग पूर्ण फेल झाली. औषध फवारायला पावसामुळे अडथळा होता. आता बाग पुन्हा उभी करण्यासाठी शक्तीच उरली नाही.’ स्थानिक शेतकरी सुनील भुतडा म्हणाले, ‘सतत पाऊस पडल्यामुळे फळ धारण्याची क्षमता कमी झाली आणि आलेल्या फळं कुजून गेल्यामुळे माझी नऊ एकर बाग पूर्ण फेल झाली. आता पुढील हंगामासाठी खरड छाटणी करून एप्रिलपर्यंत बागेची काळजी घ्यावी लागणार आहे.’
देश-विदेशात द्राक्ष निर्यात करणारा निफाड तालुक्यातील शेतकरी यंदा संकटात आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले, बागेवर सध्या होणार्या खर्चामुळे शेतकरी तणावात आहेत. निर्यातीचे स्वप्न तुटले आणि स्वतःच्या हाताने बागांवर कुर्हाड चालवणारे शेतकरी हेच आजच्या निफाडचे वास्तव आहे. ‘आभाळ फाटलं, पण आमचं दु:ख कोण ऐकणार?’ हा प्रश्न प्रत्येक बागायतदाराच्या ओठांवर आहे.
दिंडोरी, नाशिक : अशोक निकम
दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागात द्राक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात असून, सुमारे 15 हजार हेक्टरवर द्राक्षबागा आहे. मात्र, सध्याच्या नैसर्गिक संकटामुळे अनेक शेतकर्यांनी बागांवर कुर्हाड चालवली आहे. तर काही शेतकर्यांनी नवीन व्हरायटी विकसित केल्याने जुन्या बागा काढून टाकल्या आहेत. यंदा सततच्या पावसाने सुमारे 13 हजार 600 हेक्टर क्षेत्रावरील बागांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत आहवाल प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात गतवर्षीपेच्या तुलनेत उत्पादनात 70 टक्के घट होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात केवळ 30 टक्के बागांचीच परिस्थिती चांगली आहे, छाटणी झालेल्या बागांना पोंगा आला. मात्र, ढगाळ वातावरणात घड बाहेर येण्यास अडथळा निर्माण होत आहेत. एरवी वेलींवर 10 ते 15 घड येतात. मात्र, यंदा घड येण्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे झालेला खर्चही निघेल की नाही याबाबत शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
ऑक्टोबर संपत आला तरी पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत छाटणीचा विचार करता 50 ते 60 टक्के घड कमी झाले आहेत. ढगाळ वातावरणामुळे गर्भधारणा अडचणीत येऊन नुकसान होत आहे.
वैभव डोखळे, शेतकरी, खेडगाव, दिंडोरी, नाशिक
पावसामुळे फवारणीचे प्रमाण वाढले असून, उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. एका एकरावर सरासरी 1.5 ते 2 लाखांपर्यंत अतिरिक्त खर्च शेतकर्यांना करावा लागत आहे. त्यातच कमी उत्पादनामुळे बाजारात पुरवठा घटल्याने दर टिकतील, परंतु निर्यात घटल्यास एकूण उलाढाल कमी होईल.
‘नाशिक ग्रेप्स’ हा ब्रँड आंतरराष्ट्रीय बाजारात विश्वासार्ह आहे. मात्र, यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे निर्यातक्षम गुणवत्तेच्या फळांचे प्रमाण घटले, तर भारताच्या द्राक्ष निर्यातीवर विपरीत परिणाम होईल, असा इशारा निर्यातदारांनी दिला आहे.
अवकाळी पावसाने बागांचे मोठे नुकसान झाले आहे. फळधारणा घटली. बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढल्याने निर्यातयोग्य द्राक्ष घटणार आहेत.
अजित वडजे, शेतकरी, दिंडोरी, नाशिक
अतिवृष्टीमुळे जवळपास 50 टक्के बागांचे नुकसान झाल्याने उत्पादनात घटणार आहे. अजून 30 टक्के छाटणी होणे बाकी आहे. त्यामुळे निश्चित आकडेवारी सांगता येणार नाही.
कैलास भोसले, अध्यक्ष,महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघटना, दिंडोरी, नाशिक
चांदवड, नाशिक : सुनील थोरे
तालुक्यातील द्राक्षबागांना अवकाळी व सतच्या पावसाने फळकुज व घडकुजीचा मोठा फटका बसला आहे. खराब वातावरणामुळे शेतकर्यांना पाऊस पडल्यावर लगेच औषधफवारणी करावी लागत आहे. यामुळे अतिरिक्त खर्च वाढला आहे. फळकूज मोठ्या प्रमाणात असल्याने उत्पादनात 30 ते 40 टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चांदवड तालुक्यात निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यासाठी शेतकरी वर्षभर मेहनत करतात. सप्टेंबर महिन्यात बहुतेक सर्वच बागांची छाटणी होऊन द्राक्षांना घड येण्यास सुरुवात होते. यंदा मात्र सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्यांच्या द्राक्षबागांना लागलेले घडांचे फळकुज होत आहे. यासाठी शेतकरी महागडे औषधे फवारणी करीत आहेत तरी फळकूज थांबत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच पावसाची ये-जा सुरूच असल्याने यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अवकाळीने बांगांना फटका बसला आहे. द्राक्षबागांची फळकूज होत आहे. फळकूज थांबण्यासाठी अतिरिक्त औषधांची फवारणी करावी लागत आहे. तरीदेखील नियंत्रणात येत नसल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
मनोज किरकांडे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, चांदवड, नाशिक
फळकूज घडकूज उपाययोजना
योग्य घडांची संख्या, वापसानुसार पाणी नियोजन, वेळेवर शेंडा पिंचिंग करणे, पाऊस झाल्याने बागेत साठणारे पाणी बाहेर काढणे. घडात पाणी साठू नये, म्हणून वेली झटकणे अथवा ब्लोअरने हवा मारणे, संजीवकांचा सुयोग्य वापर, बागेत चांगला सूर्यप्रकाश येण्यासाठी फेल काड्या व काडीच्या खालची पाने काढावीत. मॅग्नेशियम व बोरॉन व पोटॅशची फवारणी, वेलीला ताण येऊ नये म्हणून अँटिस्ट्रेसची फवारणी, पोस्ट ब्लूम स्टेजमध्ये (27-30 दिव
सांदरम्यान) सिलिकॉनची फवारणी करणे आवश्यक आहे.
रोगांचा प्रादुर्भाव अधिकच वाढणार
अवकाळीने बागांवर बुरशी, करपा, डावण्या आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, सततच्या पावसाने पुढील काळातही रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. वेळेत औषधांची फवारणी करून रोगाराई थांबविणे हाच एकमेव मार्ग शेतकर्यांच्या हातात आहे. मात्र, यातूनही कितपत लाभ होईल हे सांगणे कठीण आहे.