नाशिक : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या शनिवारी (दि.१४) द्वारका सर्कलची पाहणी करीत, परिसरातील अतिक्रमणांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेने पोलिसांच्या सहकार्याने परिसरातील अतिक्रमणावर हातोडा चालविला.
सोमवारी (दि. १६) आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्तांसह द्वारका व अन्य भागांचा दौरा करीत, अतिक्रमणांवरून संताप व्यक्त केला. तसेच अतिक्रमणे हटविण्याच्या कामात कचुराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट निलंबित करा, अशा सूचनाही फरांदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
द्वारका, सारडा सर्कल, फाळके रोड, दूधबाजार, भद्रकाली, शिवाजी रोड, शालिमार, मुंबई नाका, वडाळा, डीजीपीनगर रोड.
द्वारकेवरील वाहतूक कोंडीवरून भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महापालिका प्रशासनाने तत्काळ अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याचे श्रेय मंत्री भुजबळ यांना देत 'भुजबळ साहेब धन्यवाद' असा मजकूर असलेले फलक झळकविले. तर चार दिवसांपूर्वी आ. फरांदे यांनी याप्रश्नी महापालिकेत बैठक घेत, द्वारका परिसरातील अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी त्या स्वत: रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यानंतर भुजबळ यांनी द्वारका चौक गाठला होता. दरम्यान, सोमवारी (दि. १६) आ. फरांदे यांनी पुन्हा अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह द्वारका परिसरासह इतर भागांचा पाहणी दौरा केल्याने, या द्वयींमध्ये 'क्रेडिट वॉर' सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
शालिमार चौकात अतिक्रमणाचा मुद्दा कळीचा असून, आतापर्यंत अनेकदा कारवाई करूनदेखील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. शालिमार भागात आ. फरांदे अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह पाहणी करणार असल्याची माहिती मिळताच, विक्रेत्यांनी काही क्षणात अस्थायी दुकाने हटवत रस्ता मोकळा केला. मात्र, आ. फरांदे यांच्यासह अधिकाऱ्यांची पाठ फिरताच विक्रेत्यांनी पुन्हा दुकाने थाटल्याचे दिसून आले. शालिमार चौकात हा पाठशिवणीचा खेळ मागील काही वर्षांपासून सुरू असून, या भागातील अतिक्रमण निर्मूलन केवळ कागदावरच आहे.
अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने, अतिक्रमणे काढण्याची कारवाई केली जात आहे. नो-पार्किंग झोनमध्ये रिक्षा उभ्या केल्या जात असतील, तर त्याबाबत दोन दिवसांत कारवाईची मोहीम हाती घेतली जाईल. शाळा, महाविद्यालय परिसरातील अनधिकृत टपऱ्यांबाबत तक्रारी आल्यास, कारवाई केली जाईल.
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक
द्वारका परिसरातील एका बाजूची अतिक्रमणे हटविली असून, दुसऱ्या बाजूचे अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेकडे मनुष्यबळाची चणचण आहे. मात्र, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून मनुष्यबळ उपलब्ध करत कारवाई सुरूच राहणार आहे.
मनीषा खत्री, महापालिका आयुक्त, नाशिक.
द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीवरून मंत्री भुजबळ आणि आमदार फरांदे आक्रमक झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून कधी फरांदे, तर कधी भुजबळ रस्त्यावर उतरत असल्याने, प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. रविवारी महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने द्वारका परिसरातील अतिक्रमणे हटविली. मात्र, केवळ द्वारकाच नव्हे तर अन्य भागांमधीलही अतिक्रमणे हटविली जावीत, यासाठी आमदार फरांदे यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (वाहतूक) चंद्रकांत खांडवी, किरणकुमार चव्हाण आदी अधिकाऱ्यांसमवेत द्वारका, सारडा सर्कल, फाळके रोड, दूधबाजार, भद्रकाली, शिवाजी रोड, शालिमार, मुंबई नाका, वडाळा, डीजीपीनगर रोड आदी भागांचा पाहणी दौरा केला. या परिसरातील अतिक्रमणे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. महापालिका प्रशासनानेदेखील तत्काळ मोजमाप घेत, अतिक्रमणे हटविण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या.
कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय कारवाई केली जावी. तसेच तत्काळ डांबरीकरण, रस्त्याचे रुंदीकरण, सिग्नल यंत्रणा बसविणे, बसथांबे याबाबतची कामे हाती घ्यावीत. अधिकाऱ्यांनी जबाबदारीत कुचराई केल्यास, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. भुयारी मार्ग बंद करावा.
देवयानी फरांदे, आमदार, नाशिक.
अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह आमदारांनी पाहणी केलेल्या भागात चांगलीच चलबिचल बघावयास मिळाली. काही विक्रेत्यांनी दिवसभरात स्वत:हून अतिक्रमणेदेखील काढून घेतली. दरम्यान, मंत्री भुजबळ व आ. फरांदे या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर ॲक्शन मोडवर आल्या नाहीत ना? अशी सुप्त चर्चा यानिमित्त रंगत आहे.