

नाशिक : नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त देश- विदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्यामुळे भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने डिसेंबरपर्यंत व्यवस्था सज्ज करावी. कुंभमेळा आरोग्य विभागाला बळकटीकरणासाठी उपयुक्त ठरणार असून त्यादृष्टीने आवश्यक त्या सोयी सुविधांची पूर्तता करण्यासाठी कामकाज करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात शनिवारी (दि. २२) सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित कुंभमेळा पूर्वतयारीबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस खा. राजाभाऊ वाजे, आ. देवयानी फरांदे, आ. हिरामण खोसकर, उपमहापौर विलास शिंदे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.
मंत्री आबिटकर म्हणाले की, भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आवश्यक यंत्रसामग्री, औषध साठ्याचे आतापासूनच नियोजन करावे, काही शासकीय रुग्णालयांची प्रलंबित कामे मोहीम स्तरावर पूर्ण करीत येत्या डिसेंबरपर्यंत ही सर्व रुग्णालये कार्यान्वित करून त्यांचे लोकार्पण करावे. वैद्यकीय क्षेत्रातील संस्था, संघटनांचे सहकार्य घ्यावे. त्यासाठी समन्व्य साधावा, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कुंभमेळा आयुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने २५४ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केल्याचे सांगितले, तर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी महामार्गावरील अपघात आणि आवश्यक उपाययोजना यांविषयी माहिती दिली, उपसंचालक डॉ. आहेर यांनी आरोग्य विभागाने कुंभमेळ्यासाठी केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली.
'फ्ल्यू' लसीकरणासाठी जनजागृती
कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांनी 'फ्ल्यू' प्रतिबंधक लसीकरण करून यावे, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, असेही नियोजन करण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या. तसेच नवीन, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून जळीत रुग्णांसाठी कक्ष कार्यान्वित करावा. त्यासाठी औषधोपचाराची पद्धती निश्चित करावी, अशीही सूचना मंत्री आबिटकर यांनी केली. तसेच त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील रुग्णांची गैरसोय होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार सद्यः स्थितीतील इमारतीत बाह्यरुग्ण विभाग कार्यरत ठेवावा. तसेच नवीन रुग्णालयासाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या