Nashik- गंगापूर रोडवर डंपर खड्ड्यात, निकृष्ट कामाचा नागरिकांचा आरोप

Gangapur Road Pothole Accident -उपमहापौरांकडून चालकाची ओव्हरलोड वाहतुकीबाबत विचारणा; रस्त्यांच्या ऑडिटची मागणी
नाशिक : नवश्या गणपती मंदिराकडे जाणाऱ्या कॉलनी रस्त्यावर रस्ता खचल्याने खड्यात अडकलेला डंपर.
(छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक : नवश्या गणपती मंदिराकडे जाणाऱ्या कॉलनी रस्त्यावर रस्ता खचल्याने खड्यात अडकलेला डंपर. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : गंगापूर रोडवरील नवश्या गणपती मंदिराकडे जाणाऱ्या कॉलनी रस्त्यावर शुक्रवारी खडी वाहून नेणारा डंपर अचानक रस्ता खचल्याने खड्यात अडकला, या घटनेनंतर नागरिकांनी रस्त्याच्या निकृष्ट कामावर संताप व्यक्त केला. घटनास्थळी पोहोचलेल्या उपमहापौर विलास शिंदे यांनी डंपरचालकाकडे ओव्हरलोड वाहतुकीबाबत विचारणा केली. डंपरच्या वजनामुळे रस्ता खचला की रस्त्याखालील भरावाच्या निकृष्ट कामामुळे ही घटना घडली, याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.

रस्त्याखाली मातीचा योग्य भराव करण्यात आला नसल्याचे चालकाने सांगितल्याचे शिंदे यांनी सांगितले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, याच ठिकाणी प्रवासी वाहन असते तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. नवश्या गणपती मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने परिसरातील रस्त्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली.

दरम्यान, मागील चार वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने नागरिक थेट प्रशासनापर्यंत पोहोचत नव्हते. परंतु आता लोकप्रतिनिधी असल्याने समस्या पुढे येत आहेत. या रस्त्यांचे ऑडिट होणे गरजेचे होते; मात्र ते झाले नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मागील सिंहस्थाच्या काळात या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. रस्त्याखाली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली होती का, अथवा पाइपलाइनच्या गळतीमुळे रस्ता भुसभुशीत झाला का, याची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यावरून ओव्हरलोड वाहन गेल्याने रस्ता अचानक खचला असण्याची शक्यता आहे. शहरातील जुन्या रस्त्यांचे ऑडिट करून आवश्यक ती कामे करून घेण्यात येतील.

- विलास शिंदे, उपमहापौर, नाशिक

हा रस्ता उदाहरणच

गंगापूर रोडवरील या घटनेमुळे शहरातील जुन्या रस्त्यांच्या कामांच्या दर्जाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कुंभमेळ्याच्या काळात करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांचे ऑडिट झाले आहे का? तसेच रस्त्याखालील पाणीपुरवठा व इतर पाइपलाइनमधील गळतीमुळे रस्ते कमकुवत होण्याचा धोका आहे का, याची तपासणी करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news