

मालेगाव (नाशिक) : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेतील 24 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांच्या नावावर व्यंकटेश को-ऑपरेटिव्ह बँकेतून बोगस कर्ज प्रकरण मंजूर करून सुमारे दोन कोटी रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आ. अपूर्व हिरे व शिवसेना (उबाठा) उपनेते अद्वय हिरे या तिघांचा जामीन फेटाळण्यात आला. अपर जिल्हा सत्र न्यायाधीश किशोर पाटील यांनी हा आदेश दिला.
संस्थेतील सुरगाणा येथील शिक्षक विलास पगार यांनी आपल्यासह 24 जणांच्या नावावर कर्ज काढल्याचे, तर आपल्या नावावर 14 लाख रुपये घेतल्याची तक्रार दिली होती. कर्ज स्वरूपात काढलेली रक्कम संस्थेच्या खात्यावर वर्ग केली. हिरे पिता-पुत्रांनी संस्थेच्या कर्मचार्यांच्या नावे कर्ज काढून स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर केला.
या गैरमार्गाने नियम धाब्यावर बसवून एक कोटी 95 लाख 45 हजार 749 रुपये कर्ज रक्कम काढून संस्थेच्या याच बँकेतील चालू खात्यात जमा केल्याचा आरोप फिर्यादीने केलेला आहे. या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात असून, अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी हिरे पिता-पुत्रांनी अर्ज केला होता. तक्रारदार पगार यांच्यातर्फे युक्तिवाद करताना अॅड. ए. वाय. वासिफ यांनी हा आर्थिक गुन्हा आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. आणखी काही शिक्षक तक्रारीसाठी पुढे येऊ शकतात. कर्जासाठी कुठलेही तारण घेतलेले नाही. संस्थेच्या शासकीय अनुदानातून कर्जाचे हप्ते भरले. एकूणच हा मोठा अपहार आहे, असा युक्तिवाद केला. युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायाधीश पाटील यांनी जामीन नामंजूर केला.