

पुढारी ऑनलाइन | त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी महाशिवरात्रोत्सवानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीचा "शिवार्पणमस्तु" हा नृत्य कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमाला प्रचंड विरोध झाल्यानंतर प्राजक्ताने मोठा निर्णय जाहीर केला आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी प्राजक्ताच्या कार्यक्रमावर आक्षेप नोंदवला होता. अशा प्रकारे मंदिर प्रांगणात सेलेब्रिटींचे कार्यक्रम करण्याचा पायंडा नको म्हणत या कार्यक्रमाला आक्षेप नोंदवणारे पत्र त्यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना दिले. तसेच पुरातत्त्व विभागाने या कार्यक्रमाला आक्षेप घेणारे पत्र देत केंद्रीय कार्यालयाकडून परवानगी घेणे आवश्यक असल्याचे नमूद केलं होतं. परंतु पूर्वनियोजित हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं देवस्थानने जाहीर केलं होतं. मात्र, या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय प्राजक्ताने घेतला आहे.
यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावे असा विचार घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिराकडून फोन आला. आम्ही दरवर्षी मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय संगिताचा कार्यक्रम आयोजित करत असतो. फुलवंतीच्या निमित्ताने आम्हाला समजलं की तुम्हीही भरतनाट्यम नर्तिका आहात, तर यंदा तुम्ही तुमच्या नृत्याचा कार्यक्रम कराल का? असे विचारण्यात आले, त्याला मी तात्काळ होकार दिला होता.
मात्र काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली. तसेच अवास्तव गर्दीची भिती माझ्या मनात आहे. मंदिराचे प्रांगण त्यामध्ये किती लोक बसतील असे प्रश्न आहे. अशा परिस्थितीत प्रशासनावर ताण येऊ नये म्हणून मी या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. माझे सर्व सहकलाकार माझ्याशिवाय नृत्य सादर करतील, अर्थात यामुळे माझ्या आनंदावर विर्जन पडले आहे, असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.