

पणजी : क्रांतिराज सम्राट
कोविड-१९ च्या काळात अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले. उद्योग बंद पडले, नोकऱ्या गेल्या आणि अनेक महिलांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. या परिस्थितीत प्रज्ञा राणे यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या 'समारोह' या नॉन-प्रॉफिट संस्थेंतर्गत सुरू झालेल्या 'घरगुती' या उपक्रमातून आज अनेक महिलांना रोजगार आणि आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली आहे.
कोविडच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महिलांना मदत करण्यासाठी प्रज्ञा राणे यांनी अनुभवाचा उपयोग केला. सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी एक टीम तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या उत्पादनांचे ऑनलाइन मार्केटिंग, ब्रोशर डिझायनिंग आणि ब्रँडिंग सुरू केले.
परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर या उत्पादनांना एकाच छाताखाली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ताळगाव येथे 'घरगुती' हे स्टोअर सुरू करण्यात आले. घरी पाहुणे आले की आपण त्यांना प्रेमाने आणि विश्वासावाने घरगुती बनवले पदार्थ देतो, हेच नाव या ब्रँडचे वैशिष्ट्य आहे, असे प्रज्ञा राणे सांगतात.
'घरगुती'मध्ये पाम ऑईल, डाल्डा किंवा आरोग्याला हानिकारक घटक न वापरता नैसर्गिक पद्धतीने बनवले पदार्थ उपलब्ध आहेत. शुद्ध तुपातील लाडू, गोव्यातील प्रसिद्ध तवसोळी, नाचण्याचे सत्त्व, अनारसे आणि अस्सल गाईच्या चिकापासून बनलेला खरवस ही येथील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
सध्या राज्यातील सुमारे ३० महिला या उपक्रमासाठी नियमितपणे उत्पादने तयार करतात, तर देशातील ४० हून अधिक महिला या व्यासपीठाशी जोडल्या गेल्या आहेत. खाद्यपदार्थांबरोबरच सेेंद्रिय गूळ, हस्तनिर्मित पिशव्या, मेणबत्त्या आणि हाताने बनवलेले दागिनेही येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
स्वावलंबातून विस्ताराकडे:
कोणत्याही सरकारी योजनेची किंवा मदतीचा लाभ न घेता स्वतःच्या गुंतवणुकीतून सुरू झालेल्या या उपक्रमाला आता कोल्हापूर, बेळगाव यांसारख्या शहरांतूनही मागणी मिळत आहे. व्यवसायाचा विस्तार करणे, अधिक महिलांना जोडून घेणे आणि घरपोच वितरणाची सक्षम यंत्रणा उभारणे हे 'घरगुती'चे आगामी उद्दिष्ट आहे.
या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक हातभार लावत असून, जुन्या पिढीतील पारंपरिक खाद्यपदार्थ आणि पाककला नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक नातेसंबंध अधिक दृढ होत असल्याचे प्रज्ञा राणे सांगतात. महिलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी बनवणारा 'घरगुती' हा उपक्रम अनेक महिलांसाठी रोजगाराची नवी संधी ठरत आहे.