

नाशिक : लक्ष्मीपूजनापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने महापालिकेच्या ‘खड्डेमुक्त नाशिक’ मोहिमेला ब्रेक लावला आहे. माती-मुरूमाने बुजविलेले खड्डे पावसामुळे पुन्हा एकदा उघडे पडले आहेत. त्यामुळे नाशिककरांचा खड्ड्यांचा जाच कायम राहिल्याचे चित्र आहे.
पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे नागरिकांना लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना दिवाळीपर्यंत नाशिक शहर खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिकेने रस्ते दुरुस्ती मोहिमेला सुरुवात केली.
महापालिका आयुक्त खत्री, शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी स्वत: रस्त्यावर उतरत दुरुस्ती कामांची पाहणी केली होती. त्यामुळे रस्ते दुरुस्ती कामांना वेग आला होता. डांबरी मिश्रणाने खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नाशिककर सुखावले होते. शहरातील सर्व मुख्य रस्ते आणि नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या मार्गांवरील खड्डे दिवाळीपर्यंत दुरुस्त करण्यात येतील, असे आश्वासन महापालिकेतर्फे देण्यात आले होते.
या आश्वासन पूर्तीला बहुतांशी यशही येत असल्याचे चित्र होते. मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासूनच नाशकात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे नाशिक पुन्हा जलमय बनले आहे. ग्रामीण भागात पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली असताना शहरातील रस्त्यांवर पुन्हा खड्डे दिसू लागले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डबकी निर्माण झाल्याने पुन्हा एकदा पादचारी आणि वाहनधारकांना अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे खड्डेमुक्त नाशिक मोहिमेला ब्रेक लागल्याचे दिसत आहे.
माती-मुरूम वाहून गेल्याने खड्डे उघडे
पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिकेने अनेक ठिकाणी डांबरी मिश्रणाने खड्डे बुजविले. मात्र बऱ्याच ठिकाणी माती-मुरूमाद्वारे खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. अशा खड्ड्यांमधील माती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे वाहून गेल्याने खड्डे पुन्हा ‘जैसे थे’ बनले आहेत.