

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांमधून स्टुडंट कॅडेट प्रोग्राम व कुंभमेळा स्वयंसेवक उपक्रम
शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली जाणार
विद्यार्थी सुरक्षेसाठी महापालिकेचा शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना
नाशिक : विद्यार्थी सुरक्षेसाठी महापालिकेचा शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासनातर्फे संयुक्तरित्या उपाययोजना राबविताना सर्व शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांमधून स्टुडंट कॅडेट प्रोग्राम व कुंभमेळा स्वयंसेवक उपक्रम राबविला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त कर्णिक बोलत होते. शालेय शिक्षणाशी संबंधित विविध प्रशासनिक, शैक्षणिक, सुरक्षा आणि सामाजिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
कर्णिक म्हणाले की, विद्यार्थ्यांची सुरक्षा हा प्रमुख मुद्दा बनला आहे. विद्यार्थ्यांवरील गैरप्रकारच्या घटना टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली जाईल. ही प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी नोडल पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. विदयार्थी सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेविषयी सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज दौंड यांनी मार्गदर्शन केले.
शाळा वाहतूक समित्यांचे कार्य, जबाबदाऱ्या आणि नियमावलीबाबत माहिती देताना वाहनचालकांची पार्श्वभूमी तपासणी आणि पालक-शाळा समन्वयाचे महत्त्व दौंड यांनी विशद केले. जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी संतोष झोले यांनी शाळांमधील सुरक्षा उपायांची तात्काळ अंमलबजावणी, सीसीटीव्ही, गार्ड, सूचना फलक, गेट रजिस्टर, पोक्सो कायदा अंमलबजावणी, सखी सावित्री समित्यांची स्थापना याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी (योजना कार्यालय) सरोज जगताप यांनी नवभारत साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, माहिती अचूकतेसाठी प्रगती अहवाल व निरीक्षणाची आवश्यकता याविषयी माहिती दिली. प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. चौधरी यांनी बीएलओ कामकाज, शिक्षक रजा प्रक्रिया, स्पेलिंग बी, शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, संयुक्त शाळा अनुदान, भविष्यवेधी शिक्षण, जीवन कौशल्ये, १५ ऑगस्टसाठी कवायत, सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी याविषयी माहिती दिली.
या बैठकीसाठी शहरातील ३९० शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. पूर्वसूचनेनंतरही उपस्थित न राहिलेल्या १५१ शाळांविरुद्ध प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही बैठक विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक सहभाग, पर्यावरण जागृती, आणि शिस्तबद्ध वागणूक या सर्वच अंगांनी अत्यंत सकारात्मक व प्रेरणादायी ठरली.