

1,416 bogus students, fraud of Rs 6.5 crore
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून पंडित दीनदयाल स्वयंम योजना राबविण्यात येते. मात्र, या योजनेच्या पोर्टलवर दोन महाविद्यालयांनी १,४१६ बोगस विद्यार्थी दाखवत शासनाची सहा कोटी ५३ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे.
या प्रकरणी आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्या सूचनेनुसार प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांच्या फिर्यादीवरून संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, लिपिक, एजंट आणि लाभार्थीविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हळदा (ता. सोयगाव) येथील संदीप गवळे यांनी १ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यांनी २०२३-२४ आणि २०२४-२५ शैक्षणिक वर्षांत स्वयंम योजनेंतर्गत महाविद्यालयांनी बनावट कागदपत्रांद्वारे लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार सहायक आयुक्त (प्रशासन) एस. आर. पेढेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रकल्प अधिकारी ते कनिष्ठ लिपिक, सहारा शिक्षण संस्थेच्या दोन प्राचार्य, कंत्राटी संगणक ऑपरेटर व कर्मचारी तसेच काही लाभार्थी व बोगस लाभार्थी यांची चौकशी केली. चौकशीत दोन्ही महाविद्यालयांनी व योजनेच्या कर्मचार्यांनी शासनाची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीनेही चेतना शिक्षण संस्थेचे वरिष्ठ कला महाविद्यालय (सांगवी बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर) यांनी स्वयंम योजनेत शासनाची दिशाभूल करून आर्थिक अफरातफर केल्याचा अहवाल दिला होता.
प्रकल्प अधिकारी मोरे यांच्या फिर्यादीनुसार, संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी व इतरांनी संगनमत करून स्वयंम ऑनलाइन प्रणालीचा गैरवापर केला. १,४१६ विद्यार्थ्यांचा खोटा प्रवेश दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची तब्बल ६ कोटी ५३ लाख १६ हजार ५० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
प्राचार्य सय्यद अरशद अफसर, प्राचार्य खलील पठाण, महेश पाडळे, समीर शामिर पठाण, अविनाश मुर्दे, संदीप गवळे, परमेश्वर सोनवणे, राहुल साळवे, रवींद्र साळवे, कैलास गवळे, पल्लवी गवळी, स्वाती पाडळे यांच्यासह इतर संबंधित अधिकारी-कर्मचारी, चेतना शिक्षण संस्थेचे प्राचार्य व इतर संबंधित अधिकारी-कर्मचारी, आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य व इतर संबंधित अधिकारी-कर्मचारी, लाभार्थी.