

As the Pitru Paksha generates a turnover of crores, cyber criminals are defrauding devotees by creating fake websites in the name of hotels and institutions.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : येथे पितृपक्षादरम्यान नारायण नागबली, त्रिपिंडी आणि कालसर्प शांती यांसारख्या धार्मिक विधींसाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतात. आधुनिक युगात ऑनलाइन निवास व पूजाविधीचे बुकिंग करण्यास प्राधान्य दिले जाते. याचाच गैरफायदा घेत काही फसवणूक करणारे गट पुढे सरसावले आहेत. पितृपक्षात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने सायबर गुन्हेगारांनी हॉटेल्स व संस्थांच्या नावाने बनावट संकेतस्थळे तयार करून भाविकांची फसवणूक सुरू केली आहे.
या संकेतस्थळांवर निवासासाठी बुकिंग करून पैसे भरल्यानंतर भाविक येथे पोहोचल्यावर त्यांना आरक्षण झालेले नसल्याचे लक्षात येते. परिणामी आर्थिक फसवणुकीबरोबरच भाविकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा निवास मिळाला नाही तर त्यांना रात्रीच माघारीही जावे लागते. विशेष म्हणजे, हे प्रकार नामांकित हॉटेल्स आणि संस्थांच्या नावाने होत असल्याने भाविकांना अधिकच फसवले जात आहे. पोलिसांनी याबाबत सतर्कता दाखवत हॉटेल, लॉज व संस्थांच्या चालकांना आपल्या नावाने बनावट संकेतस्थळ अस्तित्वात आहे का? याची खात्री करून तातडीने कळविण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, निवास व्यवस्थेबरोबरच आता पूजाविधींच्याही ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार उघड झाले आहेत. बनावट अॅप्लिकेशन तयार करून त्यावर पूजा, खर्च व आरक्षणाची माहिती दिली जाते. भाविकांकडून आगाऊ बुकिंग घेतले जाते; मात्र प्रत्यक्षात पूजा केली जात नाही. विशेष म्हणजे, या अॅप्लिकेशन्सवर पूजा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात होते असा खोटा दावा केला जातो.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने अशा बनावट संकेतस्थळांविरोधात पूर्वीच तक्रार दाखल केली आहे. ट्रस्ट विश्वस्त आणि पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी स्पष्ट केले की, कालसर्प पूजा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात होत नाही. खोट्या अॅप्लिकेशन्सवर दिलेल्या माहितीद्वारे भाविकांची दिशाभूल केली जाते. फसवणूक झाल्यास भाविकांनी तातडीने पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
स्थानिक पुरोहितांनीही या प्रकारांचा निषेध केला असून, दिशाभूल करणारी संकेतस्थळे व ॲप्लिकेशन्स तातडीने बंद करण्यात यावीत, अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरू लागली आहे.
कालसर्प पूजाविधी त्र्यंबकेश्वर मंदिरात होत नसून तो पुरोहितांच्या घरी करतात. मात्र या वास्तवाची भाविकांना जाण करून न देता केवळ आर्थिक मोहापायी काही घटक त्यांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे स्थानिक पुरोहितांच्या लौकिकाला धोका पोहोचतो. भाविकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये. याबाबत कोणाला तक्रार असल्यास त्यांनी पोलिसांत तक्रार करावी.
मनोज थेटे, अध्यक्ष, पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर