
पिंपळगाव बसवंत ( नाशिक ) : पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असणाऱ्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका आडत दाराकडे गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून दिंडोरी, निफाड आणि चांदवड तालुक्यातील टोमॅटो उत्पादकांचे अडीच कोटी रुपये थकीत आहे. हे पैसे मिळावे यासंदर्भात यापूर्वी देखील शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा आंदोलन केले. बाजार समितीकडे अनेकदा मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.2) रोजी कांदा लिलाव बंद पाडत आंदोलनाचा पवित्रा घेतला.
टोमॅटो उत्पादकांचे पैसे द्या त्यानंतरच कांदा लिलाव सुरू करा अशी घोषणाबाजी शेतकऱ्यांनी यावेळी केली. पिंपळगाव पोलिसांनी यावेळी मध्यस्थी करत शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांचे पैसे हे कष्टाचे आहे आणि ते त्यांना मिळालेच पाहिजे ही मागणी ठेवत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. यावेळी काही काळ पिंपळगाव बाजार समिती परिसरात वातावरण गंभीर झाले.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत. कांदा लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दीड तासांपासून कांदा लिलाव ठप्प आहेत. गेल्या सात महिन्यापासून व्यापाऱ्यांनी टोमॅटो उत्पादकांचे अडीच कोटी रुपये थकल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.
बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या आहेत. पैसे भेटत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार केल्याने तणाव निर्माण झाला आहे. सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. कारण त्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे व्यापाऱ्यांनी थकवले आहेत. यामुळं आज नाशिकच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटो उत्पदक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांनी थेट कांद्याचे लिलाव बंद पाडलेआहेत. तसेच लिलाव बंद पाडल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन देखील सुरु केलं आहे.
नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो आणि कांद्याची आवक येत असते. दरम्यान, वापाऱ्यांनी टोमॅटोची खरेदी करुन देखील पैसे दिले नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत या बाजार समितीच्या अंतर्गत व्यापाऱ्यांना टोमॅटोची खरेदी केली होती. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांची तब्बल अडीच कोटी रुपयांची देणी थकवली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, आंदोलन सुरु झाल्यावर व्यापारी काही निर्णय घेतात का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.