

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कर्करोगाच्या निदानासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पीईटी-सीटी स्कॅन तपासणीचे दरपत्रक राज्य शासनाने जाहीर केले आहे. विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत कर्करोग उपचारासाठी पीईटी-सीटी तपासणीचा समावेश करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने १५ ऑक्टोबरला जारी केला आहे. या निर्णयामुळे पात्र कर्करोग रुग्णांना योजनेंतर्गत तपासणीची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पीईटी-सीटी तपासणीच्या माध्यमातून कर्करोग्याची अवस्था निश्चित करणे, उपचारांना मिळणारा प्रतिसाद तपासणे, रोगाची पुनरावृत्ती झाली आहे किंवा नाही, याचे मूल्यमापन करणे शक्य होते. त्यामुळे कर्करोग रुग्णाच्या निदान प्रक्रियेत या तपासणीला विशेष महत्त्व आहे. शासनाने निर्धारित केलेल्या दरांनुसार विविध प्रकारच्या पीईटी-सीटी स्कॅनचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
संपूर्ण शरीर : २० हजार ४०० रुपये
मेंदू : १८ हजार ६५० रुपये
गॅलियम ६८ : १५ हजार रुपये
हृदय : ९,५०० रुपये
या निर्णयामुळे कर्करोग्याशी संबंधित उपचारांसाठी पीईटी-सीटी तपासणीचा अतिरिक्त निदान प्रक्रिया म्हणून समावेश करण्यात आला आहे. आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ही तपासणी स्वतंत्र व नियमित निदान प्रक्रिया म्हणून उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
तपासणीसाठी संबंधित तज्ज्ञ डाॅक्टरांची वैद्यकीय चिठ्ठी, आवश्यक कागदपत्रे आणि योजनेंतर्गत पूर्वमान्यता घेणे बंधनकारक असेल. संबंधित रुग्णालयात आवश्यक तांत्रिक सुविधा, उपकरणे आणि पात्र मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. याशिवाय, प्रत्यारोपणानंतर १२ महिने पूर्ण झाल्यावर होणाऱ्या 'पोस्ट-ट्रान्सप्लांट पॅकेज'चाही योजनेंतर्गत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पात्र रुग्णांना कर्करोगाच्या निदानासाठी योजनेंतर्गत सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.