Padmashree Karmaveer Kakasaheb Wagh | धडाडीचे नेतृत्व : पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ

Padmashree Karmaveer Kakasaheb Wagh | धडाडीचे नेतृत्व : पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ; २२ जुलै पुण्यतिथीनिमित्त विशेष अभिवादन
Padmashree Karmaveer Kakasaheb Wagh
Padmashree Karmaveer Kakasaheb Wagh
Published on
Updated on

अ. भा. मराठा विद्या प्रसारक परिषदेचे प्रमुख आधारस्तंभ, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आधारवड, निफाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व रानवड कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, इंडियन शुगर इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, नवी दिल्लीचे अध्यक्ष, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजी, शिक्षण क्षेत्रातील जाणकार, राजकारणी, सहकार-कृषी-जलसिंचन क्षेत्रात कार्यकर्ते, कामगारांचे आधार अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पेलल्या.

Padmashree Karmaveer Kakasaheb Wagh
Jennifer Monserrate | जेनिफर मोन्सेरात यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप; हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार

या विविध क्षेत्रांत कार्य करताना काकासाहेब यांनी स्वतःच्या घरापेक्षा, आपले कार्यकर्ते, कारखान्याचे सेवक आणि गरजू लोकांना अधिक जपले. त्यांच्या सुख-दुःखात त्यांना कायम साथ दिली. आपल्यापरीने त्यांच्या शक्य त्या सर्व अडचणी सोडविण्या. त्यामुळे, ही सगळी सर्वसामान्य माणसे काकासाहेब यांना दैवत मानून कार्यरत राहिली.

कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या नंतर माझे वडील व के. के. वाघ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष (कै.) बाळासाहेब (भाऊ) वाघ यांनी त्यांचा सहकार, कृषी व शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक वारसा पुढे सुरू ठेवला व या माध्यमातून काकासाहेबांप्रमाणेच (कै.) बाळासाहेब (भाऊ) वाघ यांनी निफाड तालुका केंद्रस्थानी ठेवून कोणतेही राजकारण न करता विविध पातळीवर शासन दरबारी प्रश्न सोडविण्याचा विशेष प्रयत्न केले.

राजर्षी शाहू महाराज व महात्मा फुल्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत, के. के. वाघ शिक्षण संस्था अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था, नाशिक ज्यांच्या नावाने दिमाखात सुरू आहे असे कर्मवीर काकासाहेब वाघ हे माझे आजोबा होते, हे मी माझे भाग्य समजतो. त्यांच्याप्रमाणे ते जिल्ह्याचे वैभव होते.

काकासाहेबांनी आयुष्यभर स्वतःला समाजसेवेत वाहून घेतले व या प्रवासात त्यांना माझी आजी सौ. गीताई वाघ यांची खंबीर साथ लाभली. ते समाजासाठी आयुष्यभर झटणाऱ्या कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज, बडोदा संस्थानाचे सयाजीराव गायकवाड महाराज व महात्मा फुलेंच्या विचारांचे पाईक असल्याने त्यांनी शेतकरी आणि बहुजन समाजासाठी आयुष्यभर आपले सक्रिय योगदान दिले.

काकासाहेबांनी नाशिक जिल्ह्यात शिक्षण प्रसार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निश्चय केला आणि भविष्यात तो पूर्णही केला. सन १९४८ मध्ये मुंबई प्रांताने समान दर्जाचा तांदूळ असूनही इगतपुरीच्या तांदळाला गुजरातच्या तांदळा पेक्षा कमी भाव देण्यात आला. परिणामी, गुजराती व मराठी प्रांतवाद उफाळला ही बाब काकासाहेब वाघ यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी मोरारजी देसाई यांच्यासोबत वैचारिक मतभेद असताना देखील भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली.

मात्र, मोरारजी देसाई यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. याविरुद्ध काकासाहेब वाघ यांनी भातशेती लढा उभारला. त्याचा परिणाम काकासाहेबांना मुंबई प्रांतातील ६ जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर या लढ्याचे नेतृत्व गीताई वाघ यांनी केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो की, जंगल लढा त्यात काकासाहेब वाघ यांनी हिरिरीने सहभाग घेतला.

१९५७ साली द्विभाषिक मुंबई राज्यातील विधानसभा निवडणुकीत ते कम्युनिस्ट पक्षाकडून निफाड मतदारसंघातून 'आमदार' म्हणून निवडून आले. सन १९६५ रोजी देशाचे संरक्षणमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण दिल्लीत गेल्यावर त्यांना खासदार होणे आवश्यक होते. त्यावेळी त्यांना नाशिक येथून 'खासदार' म्हणून बिनविरोध निवडून दिले. या कृतज्ञतेपोटी व काकासाहेब वाघ यांच्या प्रयत्नांमुळे ओझर येथे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित मिग विमान कारखाना अर्थात एच.ए.एल. सुरू केले.

सहकारी तत्त्वावर त्यांनी निफाड, गिरणा, रानवड, नाशिक व कादवा कारखान्यांकरिता मंजुरी मिळवून दिली. पुढील काळात यातील काही कारखाने आर्थिकदृष्ट्या फायदेशीर न ठरल्याने त्यांनी नाशिक - सिन्नर, पळसे - रानवड - विंचूर, चांदवड - कादवा या कारखान्यांचे एकत्रीकरण केले.

Padmashree Karmaveer Kakasaheb Wagh
Jennifer Monserrate Passes Away | जेनिफर मोन्सेरात यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली

साखर संघाचे अध्यक्ष असताना केंद्र शासनाकडून १,२५० मेंट्रिक टनाचा परवाना मिळवून दिला. थोड्याच दिवसांत निफाड कारखान्याची क्षमता वाढविण्याची गरज निर्माण होताच काकासाहेब वाघ यांनी प्रयत्न सुरू केले. काकासाहेबांनी आयुष्यात विविध जबाबदाऱ्या आणि आव्हाने पेलली.

काकासाहेब वाघ यांचे हे त्यागमय जीवन, त्यांनी सहकार, कृषी शिक्षण, सामाजिक व राजकीय या क्षेत्रात सामाजिक बांधिलकीने उभारलेले भव्यदिव्य कार्य, त्यांची तळमळ आणि काम करून घेण्याची हातोटी यामुळे जनतेने त्यांना 'कर्मवीर' ही पदवी बहाल केली. अनेक सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले. काकासाहेब वाघ यांच्या समाजाप्रति त्याग, समर्पण व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी केलेले अहोरात्र कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल २६ जानेवारी १९७० रोजी त्यांना 'पद्मश्री' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला. दि. २२ जुलै पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यास के. के. वाघ शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी - माजी विद्यार्थी, पालक व हितचिंतक यांच्या वतीने विनम्र अभिवादन!

श्री. समीर बाळासाहेब वाघ, अध्यक्ष, के. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news