मौखिक आरोग्य दिन : दीर्घायुषी दातांसाठी दोनवेळा ब्रश अनिवार्य

मौखिक आरोग्य दिन : दीर्घायुषी दातांसाठी दोनवेळा ब्रश अनिवार्य
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दरवर्षी ५ फेब्रुवारी हा दिवस डॉ. जी. बी. शंख्वाळकर यांचा जन्मदिन 'मौखिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. दातांच्या आरोग्याला फारसे गांभीर्याने घेतले जात नाही पण जेव्हा दात-दाढदुखी सुरू होते आणि खाण्याचे हाल होतात, तेव्हा दातांचे खरे महत्त्व लक्षात येते. म्हणूनच दातांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. एकदा सकाळी ब्रश केल्यानंतर अनेकजण थेट दुसऱ्या दिवशी करतात परंतु, दातांचे अस्तित्व दीर्घकाळ सुदृढ राहण्यासाठी दररोज दोनवेळा ब्रश करणे अनिवार्य असल्याचे दंतरोग तज्ज्ञ सांगतात.

रात्रीच्या जेवणानंतर विशेषत: गोड पदार्थ खाल्ल्यानंतर ब्रश केला नाही, तर दातांवर विशिष्ट थर जमा होतो आणि कालांतराने जसेजसे वय वाढते तसे दंतसमस्या वाढायला सुरवात होते. तरुणपणात योग्य गुंतवणूक केली, तर त्याचा फायदा उतारवयात होतो. त्याचप्रमाणे लहानपणापासून दातांची नियमित काळजी घेतली, तर वृद्धापकाळात दातांच्या समस्या निर्माण होत नाहीत. लहानपणी किडलेले, दुधाचे दात पडले, तरी येणाऱ्या नवीन दातांना धोका असतो म्हणूनच दोनवेळा ब्रश करण्याची लहानपणापासून लावलेली सवय सोयीची ठरते. कारण वृद्धावस्थेत दातांची झीज झाल्यानंतर मौखिक आरोग्य सांभाळणे कठीण असते. त्यासाठी आतापासूनच काळजी घ्यायला हवी. मौखिक आरोग्य निरोगी असले की, दिवस आनंददायी जातो.

तीन महिन्यांनी टूथब्रश बदला

दात मजबूत राहण्यासाठी हिरड्या त्यांच्याभोवती असतात. हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी मुखाचे आरोग्य राखणाऱ्या सवयींचा अवलंब करावा. दररोज किमान दोनदा ब्रशने दात स्वच्छ घासावे. दिवसातून एकदा दातांमधील फटी साफ कराव्या. हिरड्या लाल आणि सुजलेल्या असतील, त्यामधून रक्त येत असेल, तर जंतुसंसर्ग झाला आहे असे समजा. फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट आणि नरम केसांचा ब्रश वापरा. दातांबरोबर जीभही घासा तसेच दर दोन-तीन महिन्यांनी टूथब्रश बदलायला हवा.

गोड, थंड पदार्थ खाल्ल्यानंतर दातांना ठणक लागत असेल, तर पूर्वीपासून दातांची काळजी न घेतल्याचे दुष्परिणाम असतात. एकदा सकाळी ब्रश केल्यानंतर रात्री ब्रश करणे टाळले जाते. पण ब्रश करायला किती वेळ लागतो? दररोज दोन वेळा ब्रश करणे ही सवय असायली हवी. यामुळे दातांच्या अनेक समस्या दूर होतात. -डॉ. विनोद व्यवहारे, दंतविकार तज्ज्ञ

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news