

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील मतदारांचे गणना अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० जून ते १७ ऑगस्ट या कालावधीत सुरू आहे. या प्रक्रियेस आता केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आपले गणना अर्ज आपल्या बीएलओमार्फत भरून द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत जिल्ह्यातील सर्व १५ विधानसभा मतदारसंघांत सुरू असलेल्या कामाचा आढावा झाला.
तालुकानिहाय सुरू असलेल्या कामाची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. निफाड, दिंडोरी आणि इगतपुरी या मतदारसंघांत १०० टक्के काम पूर्ण झाले, तर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदारसंख्या सर्वाधिक असून, तेथील गणना अर्ज भरण्याचे काम ७३ टक्के पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या nashik.gov.in पोर्टलवर तसेच मतदार यादीसंदर्भातील अधिकृत माध्यमातून माहिती उपलब्ध आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी तसेच त्यांनी नेमणूक केलेल्या केंद्रीय प्रतिनिधींनी याद्या डाउनलोड करून मतदारांची पडताळणी करावी. या अनुषंगाने हरकती असल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहनही करण्यात आले.
मतदान केंद्रस्तरीय गृहभेटी - ३० जून ते १७ ऑगस्ट
मतदान केंद्र सुसूत्रीकरण/पुन रचना - १७ ऑगस्टपर्यंत
मतदारयादीचा प्रारूप प्रसिद्धी - २४ ऑगस्ट
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी - २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर
दावे व हरकती निकाली काढणे - २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर
मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी - २७ ऑक्टोबर