

सटाणा (नाशिक) : कांद्याच्या गडगडलेल्या बाजारभावाच्या विरोधात बळीराजा संतप्त झाला आहे. या असंतोषाला वाट मोकळी करून देत सोमवारी (दि. 15) शेतकरी संघटनांसह, कांदा उत्पादक व विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने येथील राष्ट्रीय महामार्गावरील शिवतीर्थजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाने शिवतीर्थ दणाणून सोडले होते. यामुळे साक्री - शिर्डी व सटाणा - मालेगाव रस्त्यावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाने झालेल्या वाहतूक कोंडीमुळे दोन्ही मार्गांवरील रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उन्हाळी कांदा उत्पादनात आघाडीवर असलेल्या बागलाण तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्थाच त्यावर अवलंबून आहे. चालू वर्षी कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. दरातील सततच्या चढउतारामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. या असंतोषाला या आंदोलनाच्या माध्यमातून वाट मिळाली.
शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटना व उत्पादकांनी दिला. बाजार समितीचे संचालक डॉ. राहुल सोनवणे, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, कांदा उत्पादक संघटना व शेतकर्यांनी एकत्रित येत केलेल्या आंदोलनात राजकीय पक्षांचे पदाधिकारी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. सकाळी 9 पासून महामार्गावर शेतकर्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी बाजार समिती माजी सभापती संजय सोनवणे, डॉ. सोनवणे, शिवसेनेचे लालचंद सोनवणे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी, रयत क्रांती संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते कुबेर जाधव आदींची भाषणे झाली. या वक्त्यांनी शासकीय धोरणांचा तीव्र निषेध व्यक्त करतानाच कांदा बाजारभावाबाबत शासनाने तत्काळ दीर्घकालीन धोरण न स्वीकारल्यास असंतोषाचा भडका उडेल, असा इशारा दिला. तहसीलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, नाफेड, एनसीसीएफची कांदा विक्री तत्काळ थांबवावी, कांद्याला जास्त बाजारभाव मिळावा, कांदा निर्यात धोरण बदलावे, कर्जमाफी जाहीर करावी आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात व्यंगचित्रकार किरण मोरे, भास्कर बागूल, देवीदास अहिरे, सुभाष शिंदे, गणेश काकुळते, संदीप सोनवणे, प्रवीण अहिरे, यशवंत गुंजाळ, नरेंद्र जाधव, वैभव वाघ, ज्ञानेेशर जाधव,बापू जाधव, भिका सूर्यवंशी, दादाजी सूर्यवंशी, उमेश खैरनार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दीड तासानंतर दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनस्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कांद्याचे भाव कोसळलेले असताना शासनाने नाफेड व एनसीसीएफची कांदा विक्री सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. शासनाने ही विक्री तत्काळ थांबवावी. निर्यातीसाठी वाहतूक अनुदान द्यावे अन्यथा शेतकर्यांचा उद्रेक होईल.
केशव सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना
दै. ‘पुढारी’ने ‘सह्याद्रीचा माथा’ या साप्ताहिक सदरातून सोमवारी (दि. 15) ‘कांदा आता शेतकर्यांना रडवतोय, सत्ताधार्यांना निवडणुकीत रडवणार’ या मजकुराच्या माध्यमातून कांद्याचे राजकारण, शेतकर्यांचे अर्थकारण, नाफेड - एनसीसीएफ उपाय की, संकट शेतीवरील परिणाम व उपाययोजना या संदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. आंदोलनस्थळी या वृत्ताची व दै. पुढारी’ची चर्चा होत होती.