

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
देशांतर्गत कांद्याचा पुरवठा वाढवून दर नियंत्रणात ठेवण्यासाठी इजिप्तमधून कांदा आयात सुरू असतानाच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील नवीन खरीप कांद्याची आवक वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला मिळणारी मागणी काही प्रमाणात कमी झाली असून, नाशिकच्या कांदा बाजारात दरावर दबाव निर्माण झाला आहे.
मागील पंधरवड्यात वाशी एपीएमसी बाजारात इजिप्तचा २७ टनांचा कंटेनर कांदा दाखल झाल्यामुळे आयातीत कांद्याचीही नोंद बाजारात झाली आहे. या दुहेरी पुरवठ्याचा परिणाम लासलगाव बाजार समितीतील दरावर स्पष्टपणे दिसत आहे.
गुरुवारी (दि. १) उन्हाळ कांद्याला सरासरी ४,४५१ रुपये आणि कमाल ५,२०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. मंगळवारी (दि. ६) सरासरी दर ३,९०० रुपये, तर कमाल दर ४,४५१ रुपयांवर आला. अवघ्या सहा दिवसांत सरासरी दरात ५५१ रुपये (१२.४ टक्के), तर कमाल दरात ७५० रुपये (१४.४ टक्के) प्रतिक्विंटल घसरण झाली आहे.
आवक वाढली:
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील खरीप कांद्याची काढणी ऑगस्टअखेरपासून सुरू झाली असून, आता तेथील बाजारपेठेंमध्ये नवीन कांद्याची आवक वाढत आहे. ताजा कांदा उपलब्ध झाल्यामुळे व्यापारी तसेच निर्यादारांकडून त्याला पसंती मिळत आहे. परिणामी महाराष्ट्रातील जुन्या उन्हाळ कांद्याच्या मागणीवर त्याचा परिणाम होत असून, नाशिकच्या बाजारपेठेतील दरावर दबाव वाढला आहे.
प्रतवारीत घट:
यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये उन्हाळ कांद्याची साठवणूक केली होती. मात्र, बदलत्या हवामानामुळे साठवलेल्या कांद्याची प्रतवारी खालावली आहे. खराब, चोपडा आणि कमी प्रतवारीच्या कांद्याचे प्रमाण वाढल्यामुळे बाजारातील एकूण दर्जावरही परिणाम झाला आहे. परिणामी चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या दरावरही त्याचा अप्रत्यक्ष दबाव निर्माण होत आहे.
कांदा दर (प्रतिक्विंटल):
किमान: १,००० रुपये
कमाल: ४,४५१ रुपये
सरासरी: ३,९०० रुपये
दबाव कायम राहण्याची शक्यता:
दक्षिण भारतातील खरीप कांद्याची आवक आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आयातीत कांद्याची बाजारातील उपलब्धता आणि साठवलेल्या उन्हाळ कांद्याची घटलेली प्रतवारी यामुळे नाशिकच्या कांदा बाजारासमोरील आव्हान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत नवीन खरीप कांद्याची आवक आणि त्याला मिळणारे दर याकडे कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.