पुढारी ऑनलाइन डेस्क : भारत सरकारने कांदा निर्यात बंदी वरील घातलेले किमान निर्यात मूल्य दराचे निर्बंध उठविले यानंतर लागलीच दुसरे नोटिफिकेशन काढत कांद्यावरील निर्यात शुल्क 20 टक्क्याने घटविल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत या निर्णयाचे स्वागत केले आहे.
कांदा निर्यातीवरचे किमान शुल्क हटवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मी पंतप्रधान मोंदीना धन्यवाद देतो. कांद्यावरील निर्यात बंदी अगोदरच उठविण्यात आली होती मात्र निर्यात शुल्क लावण्यात आलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत होते.
मी देखील या संदर्भामध्ये केंद्राला विनंती केली होती. किमान निर्यात शुल्क (५५० डॉलर्स प्रति मेट्रिक टन) हटवण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून कांदा निर्यातीत लक्षणीय वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा बाजारात आल्याने कांद्याचे भाव पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी, निर्यातदार यांनी कांदा निर्यातीचे शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. याचे कारण म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा कांदा भारतीय कांद्यापेक्षा अतिशय कमी दरात जागतिक बाजारपेठेत विक्री होत असल्याने भारतीय कांद्याची मागणी घटली होती. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.