

लासलगाव (नाशिक) : येथील बाजार समितीत दोन आठवड्यात उन्हाळ कांद्याच्या दरात प्रति क्विंटल कमाल ५०१ तर सरासरी १५० रुपयांची घसरण झाली आहे. गत सोमवारच्या तुलनेत किमान 399 रुपयांनी भाव कोसळ्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन आठवड्यापूर्वी दि. २१ जुलैला कांदा कमाल २१०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला, मात्र सोमवार (दि. ४) १५९९ रुपये भावाने विक्री झाला. उन्हाळ कांदा काढणी सुरू झाल्यानंतर मे महिन्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सततच्या पावसामुळे काढणी केलेला कांदा भिजल्याने कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला. दोन पैसे पदरात पडतील या अपेक्षेने कांदा उत्पादकांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता सडू लागला आहे. कांद्याची नासाडी होत असल्याने कांदा विक्री करावा तर अपेक्षित दर नाही सध्या बाजार समितीत मिळत असलेले दरात उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
यंदा केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ यांना तीन लाख मॅट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याची उद्दिष्ट देऊन ३० जुलै अंतिम मुदत दिली होती. उद्दिष्टापूर्वीच निम्मी कांदा खरेदी झालेली असताना मुदत संपल्याने कांदा खरेदी बंद केली आहे. महाराष्ट्रात ४४ ठिकाणी नाफेड आणि एनसीसीएफ ने कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहे. त्या त्यापैकी ३८ केंद्र नाशिक जिल्ह्यात आहे. नाफेडने कांदा खरेदी करण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यात सांगितले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी नावे नोंदवूनही त्यांचा कांदा खरेदी होऊ शकलेला नाही. शासनाने नाफेड आणि एनसीसीएफला मुदत वाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.