

नाशिक : केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघ (नाफेड) या संस्थेने अवसायनातील सहकारी संस्थेकडून खरेदी केल्याचे उघड झाल्यावर जिल्हा उपनिबंधक यांनी नाफेडला नोटीस बजावली. यावर खडबडून जाग्या झालेल्या नाफेड संस्थेने आता संबंधित संस्थेकडून सुरू असलेली खरेदी प्रक्रिया थांबवली आहे. तसेच अधिकृत नोंदणीसाठी वापरात येणारे ‘लॉगिंन’बंद करण्यात आले आहे.
कांदा खरेदी मिळण्यासाठी बाळासाहेब ठाकरे अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्थेने अर्ज केलेला होता. पुढे अटी- शर्तीनुसार कागदपत्रे सादर केल्यानुसार ‘नाफेड’ने संबंधित संस्थेला पात्र ठरवले. संस्थेची कागदपत्रे खरेदी केंद्र निवड समितीने तपासली. त्यानुसार पुढे ही संस्था खरेदीसाठी पात्र ठरली. प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर ‘नाफेड’ नाशिक शाखेच्या अधिकारी व प्रतिनिधींनी या केंद्रावर भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली होती.
मात्र गैरप्रकार दिसून आला नाही, असे अधिकाऱ्यांनी दावा केला आहे. जवळपास पाच हजार क्विंटल कांदा खरेदी संबंधित संस्थेला देण्यात आली होती. त्यापैकी ८० टक्के खरेदी पूर्ण झाली. त्यामुळे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागामार्फत किंमत स्थिरीकरण योजनेंतर्गत खरेदी केलेला जवळपास सहा कोटींचा कांदा संबंधिताच्या ताब्यात असल्याची माहिती मिळते. त्यामुळे तो ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. याशिवाय संबंधित संस्थेचे शिल्लक खरेदी तत्काळ थांबवली आहे. तर खरेदीपश्चात कांद्याचा साठा अधिकृत नोंदणी होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘सप्लाय व्हॅलीड पोर्टल’वर ‘लॉगिन’ बंद केले आहे. तर पुढील चौकशी सुरू झाली आहे.