

वणी (नाशिक) : वणी परिसरात नायलॉन मांजाचा वापर रोखण्यात ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस विभाग अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत सध्या पतंग उडविणाऱ्यांची संख्या वाढलेली असून, शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणात वापरात असल्याचे आढळून येत आहे.
संभाव्य धोका
पतंग उडविताना कापलेली पतंग अनेक ठिकाणी उंच झाडांवर तसेच वीज खांबांवर अडकलेली दिसत आहे. या नायलॉन मांजामध्ये पक्षी अडकून जखमी होण्याची शक्यता असून रस्त्यावर पडलेला मांजा पादचाऱ्यांच्या पायात अडकत असल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. सुदैवाने अद्याप गंभीर जखमी होण्याची घटना घडलेली नसली, तरी भविष्यात धोका नाकारता येत नाही.
वणी शहरात नायलॉन मांजाची विक्री चोरून-लपून सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिस यंत्रणा व ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. प्रत्यक्षात पतंग उडविणाऱ्यांकडे नायलॉन मांजा कुठून येतो, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. शहरातील काही रस्त्यालगतच्या झाडांवर नायलॉन मांजा लटकलेला स्पष्टपणे दिसून येत आहे.
काही दुकानदारांकडून दुकानाबाहेर साध्या पतंगाच्या दोऱ्यांच्या चक्र्या लावून प्रशासनाची दिशाभूल केली जात असल्याचेही बोलले जात आहे. प्रत्यक्षात लपून नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
हौशी पतंग उडविण्याचे प्रकार सध्या वाढत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस विभागाने संयुक्तपणे कसून चौकशी करून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.