

नाशिक: नायलॉन मांजाची साठवणूक, विक्री व वापरास बंदी असतानाही बेकायदेशीरपणे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हेशाखा युनिट दोनने अटक करत त्याच्याकडून सुमारे ७० हजार ९०० रुपये किंमतीचा नायलॉन मांजाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्याच्या ताब्यातील मांजाचे ६६ गट्टे आणि ७ प्लास्टिक चकऱ्या जप्त करण्यात आल्या. उपनगरातील जगताप मळा परिसरातील सूर्यसुंदर सोसायटीत , एका बंद फ्लॅटसमोर यश काळे नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या आदेशानुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार तसेच पथकाने छापा टाकत यश मनोहर काळे (वय १९) याला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.