

नाशिक : शहरात पक्षी, नागरिक आणि वाहनचालकांच्या जीवाला धोका ठरणाऱ्या नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. सोमवारी (दि. २२) शहर गुन्हे शाखा युनिट- १ च्या पथकाने जुन्या नाशिकमधील चव्हाटा परिसरात एका नायलॉन मांजा विक्रेत्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत २४ हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे २४ गट्टू जप्त करण्यात आले.
या प्रकरणी अजिम मोहम्मद इकबाल शेख (४०, रा. नाईकवाडीपुरा) याच्या विरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शहर गुन्हे शाखा युनिट - १ चे हवालदार संदीप भांड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांना जुने नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सोमवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित विक्रेत्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, अजमेरी मस्जिद परिसरात संशयास्पद हालचाली करत असलेला अजिम शेख नायलॉन मांजाचे गट्टू असलेली पिशवी घेऊन जाताना आढळून आला.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यास ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडून २४ गट्टू नायलॉन मांजा आढळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करत आरोपीसह पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान, नायलॉन मांजामुळे होणारे अपघात आणि पक्ष्यांचे होणारे मृत्यू लक्षात घेता, अशा बेकायदेशीर विक्रीविरोधात कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.