

नाशिक : राहुल रनाळकर
उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षामध्ये सातत्याने होत असलेले नेत्यांचे प्रवेश हे केवळ संख्यात्मक वाढ नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आतापासून सुरूअसलेली तयारी आहे. भाजप हा सतत निवडणुकांसाठी तयार असलेला पक्ष मानला जातो. प्रतिस्पर्धी पक्षांमधील प्रबळ नेते स्वपक्षात घेऊन ताकद वाढवायची किंवा संबंधित नेत्याची ताकद एका ठिकाणी बसवून संपुष्टात आणायची, ही रणनीती या घडामोडींत दिसून येते.
धुळे लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे नेते कुणाल पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. 75 वर्षांचा काँग्रेसचा वारसा अखेर त्यांनी त्यागला. धुळे ग्रामीण आणि धुळे जिल्ह्यात कुणाल पाटील यांना साथ देऊ, असा स्पष्ट शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिला आहे. धुळ्याला विकासाची प्रतीक्षा आहे. नेमका हाच धागा पकडून आपण विकासासाठी भाजपमध्ये आल्याचे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री राहिलेले डॉ. सुभाष भामरे मराठा फॅक्टरवर निवडून येत होते. मुस्लिम मते लक्षवेधी असली तरी विजयी फॅक्टर मराठा आहे. कुणाल पाटील यांच्या रूपाने लोकसभेची जागा भाजपला मिळेल आणि मतदारसंघाला धुळ्यातील उमेदवार मिळेल, असे गणित भाजप श्रेष्ठींनी मांडले आहे. कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाने मंत्री जयकुमार रावल यांच्या वर्चस्वाला धक्का बसेल, हीदेखील पक्षांतर्गत दिग्गजांची चाल यामागे दिसते.
शिंदे सेनेत जाण्याचे निश्चित झाल्यानंतर अपूर्व हिरे यांना अचानक भाजप राष्ट्रीय अध्यक्षांचा फोन येतो व ते भाजपात दाखल होतात. या घटनाक्रमात पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. अपूर्व हिरे यांच्या भाजप प्रवेशाने आ. सीमा हिरे यांना काहीअंशी दिलासा मिळाला. आधी एकमेकांचे विरोधक असलेले नेते समान शत्रूमुळे एकत्र आल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले, तर मंत्री गिरीश महाजन यांना दादा भुसे यांना मालेगावात रोखण्यासाठी एक चेहरा मिळाला आहे.
विद्यमान आमदार राहुल ढिकले अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. सीमा हिरे यांनी जसा विरोध सुधाकर बडगुजर यांना केला, तसाच पण फार प्रकाशझोतात न येता राहुल ढिकले यांनी केला. तथापि, भाजप श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आमदार ढिकले यांनी मान्य केला. निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही, असे मनोगतही त्यांनी व्यक्त केले. गीते यांच्यासोबत सचिन मराठे, प्रशांत दिवे, कन्नू ताजणे, कमलेश बोडके हे माजी नगरसेवकही भाजपात गेले आहेत.