

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मार्च महिन्याच्या प्रारंभीच सूयनि आपले प्रखर तेज दाखविण्यास सुरुवात केल्याने, उत्तर महाराष्ट्र तापला आहे. नंदुरबार जिल्ह्यात बुधवारी (दि.४) सर्वाधिक ३७. ३ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली असून, पाठोपाठ जळगाव (३७.२) तापले आहे.
थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्येही उन्हाच्या झळा लागत असल्याने, पुढील काही दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. राज्यात सध्या सर्वाधिक उष्णता विदर्भात नोंदविली जात आहे.
अकोला (३८.६), वर्धा (३८.५), अमरावती (३८.४) या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कमाल तापमान नोंदविले जात आहे. विदर्भानंतर सर्वाधिक कमाल तापमान उत्तर महाराष्ट्रात नोंदविले गेले आहे. नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि धुळे हे चारही जिल्हे तापले असून, मार्चच्या मध्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गतवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने सुरुवात केल्याने, उन्हाळा फारसा जाणवला नाही. संपूर्ण एप्रिल महिन्यात ढगाळ वातावरण राहिल्याने, उन्हाळा अनुभवता आला नाही. यंदा मात्र, स्थित वेगळी असेल, असे अगोदरच हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्याची झलक मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातच मिळाली असून, तापमान ३७ अंश सेल्सिअस पार गेले आहे.
उष्णतेची लाट येणार
सध्या विदर्भात उष्णतेची लाट आली असून, पुढील आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात देखील उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने, वातावरणात गारवा होता. मात्र, आता कमाल तापमानातही मोठी वाढ होऊ लागल्याने, सकाळच्या सुमारास देखील उष्णता जाणवण्याचा अंदाज आहे.