NMC School Nashik | मनपाच्या 29 हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश
नाशिक : नाशिक महापालिकेच्या ९६ शाळांमधील २८ हजार ७५० विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळणार आहे. गणवेश खरेदीची अधिकार पूर्ववत शाळा व्यवस्थापन समित्यांना देण्यात आले असून गणवेश खरेदीसाठी शासनाकडून ८६.२५ लाखांचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे.
महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात ९६ प्राथमिक शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये २८,७५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उन्हाळी सुटीनंतर येत्या १६ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य तसेच नवीन पाठ्यपुस्तके देण्यात यावे, असे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे आदेश आहेत. त्यानुसार राज्य शासनाकडून महापालिकेला प्रत्येक विद्यार्थ्याला एका गणवेशासाठी ८६ लाख २५ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या गणवेशांचे वाटप झाल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दुसऱ्या गणवेशाकरता शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे. गणवेश वाटपसंदर्भात येत्या ११ ते १३ जुन या कालावधीत मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुखांची आढावा बैठक घेऊन सूचना केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासनाधिकारी मिता चौधरी यांनी दिली.
मोफत पाठ्यपुस्तकेही मिळणार
महापालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकेही दिली जाणार आहेत. त्याबाबतचे देखील नियोजनही सुरू आहे. शाळानिहाय साहित्य वाटपाचे नियोजनही पूर्ण झाले आहे. गणवेश तसेच शालेय साहित्य यामुळे मनपा विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा हातभार मिळणार आहे.
मनपाच्या सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार संबंधीत मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना सूचना पत्र देण्यात आले आहे. गणवेशांचा दर्जा चांगला असावा यासाठी काळजी घेतली जाणार असून, मुलांना गणवेश वेळेत मिळावे यासाठी नियोजन केले जात आहे.
मिता चौधरी, प्रशासनाधिकारी, मनपा

