

नाशिक : दरवर्षी राज्य शासनातर्फे राज्यातील शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश, एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे मोफत दिले जातात.
गणवेश योजनेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या एका गणवेशासाठी ३०० रुपये व बूट- पायमोज्यासाठी १७० रुपये अशी एकूण ४७० रुपये रक्कम शाळा व्यवस्थापन समित्यांना दिली जाणार आहे. मात्र, महागाई वाढलेली असताना या तोकड्या रकमेत दोन गणवेश, दोन बूट आणि दोन जोडी पायमोजे कसे मिळणार, असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समित्यांनी उपस्थित केला आहे. शासनाने ही रक्कम वाढून द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले व दारिद्र्य रेषेखालील मुलांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. गणवेश योजनेसाठी प्रति गणवेश ३०० रुपये याप्रमाणे राज्य शासनानेसुद्धा दोन गणवेशासाठी ६०० रुपयांची रक्कम निश्चित केली आहे. गणवेशाचा लाभशाळा व्यवस्थापन समिती मार्फत निर्णय घेण्यात आला आहे. कमी रक्कमेत बूट, पायमोजे खरेदी करण्यासाठी मुख्याध्यापकांसह शाळा व्यवस्थापन समितीला दुकानदारांकडे पायपीट करावी लागणार आहे. शासनाने वाढत्या महागाईचा विचार करून गणवेश व बुटाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा परिषद शाळांतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थिनींना व अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळतो. यात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश, एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे दिले जाते.
गतवर्षी बचत गटामार्फत शिलाई करून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याचा निर्णय दिला होता. मात्र, विद्यार्थ्यांचे माप चुकले होते. अनेक विद्यार्थ्यांच्या अंगात गणवेश जात नव्हता. कुठे जास्त तर कुठे कमी, असे वितरण करण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यामुळे यंदा मात्र गोंधळ होऊ नये, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी खबरदारी घेत आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक, गणवेश दिल्यास त्यांचा उत्साह वाढेल. मात्र, इतक्या कमी किमतीत गणवेश, बूट, पायमोजे कसे मिळणार. त्यासाठी शासनाने शाळा सुरू होण्यापूर्वी वस्त्रोद्योगाकडून विद्यार्थ्यांना गणवेश मिळवून द्यावेत. शासनाने वाढीव निधी वेळात वर्ग करावा.
ज्योती भिसे, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, माेह प्राथमिक शाळा, सिन्नर, नाशिक.