नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | भूसंपादन मोबदला, ठेकेदारांना झुकते माप, गोदावरी नदी प्रदूषण अशा विविध विषयांवरून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महापालिकेच्या गेल्या पाच वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढावी आणि अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी तर्फे नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, वसंत ठाकूर, सचिव राहुल दिवे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मनपाला 350 पेक्षा जास्त जणांना भूसंपादनाचा मोबदला द्यायचा होता. प्राधान्यक्रम डावलून केवळ 11 बांधकाम व्यावसायिकांना 55 कोटींचे वाटप करण्यात आले आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मोबदला मिळालेला नाही. त्यांच्या नावाखाली मात्र मोठ्या ठेकेदारांनी शेतकरी असल्याचे बनावट कागदपत्रे सादर करुन प्रशासनाच्या संगनमताने कोट्यवधींचा नफा घशात घातल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. गेल्या 24 वर्षात नाशिक महानगरपालिकेत एकही भरती न झाल्यामुळे नागरी सुविधा पुरविताना अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याआधी सर्व संवर्गातील पदे लवकरात लवकर भरण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
भूसंपादन मोबदला, ठेकेदारांना झुकते माप, गोदावरी नदी प्रदूषण आदी विषयांवरून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महापालिकेच्या मागील पाच वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढावी आणि अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी तर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले.
फेरीवाला क्षेत्राची निर्मिती, सफाई कर्मचाऱ्यांना न्याय, सिंहस्थासाठी पाचशे एकर जागेचे कायमस्वरुपी संपादन, सुरळीत पाणी पुरवठा, फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून जागा निश्चिती, मोकळ्या जागांवर वाहनतळ उभारावे. जिल्ह्यातील नदीत मिसळणारे सांडपाणी त्वरित थांबविण्यासाठी सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करण्यात याव्यात, कुंभमेळा नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय अध्यक्ष व नागरिकांचा समावेश करण्याची मागणी करण्यात येवून मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.