

नाशिक : महापालिकेने अमृत २.० अंतर्गत २२७ कोटींचा मलनिस्स्सारण प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाला नव्याने तांत्रिक मान्यता मिळण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय येथे राज्यस्तरीय तांत्रिक समितीसमोर मंगळवारी (दि. २२) प्रकल्पाचे सादरीकरण केले जाणार आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून अमृत २.० अभियानांतर्गत मंजूर प्रकल्पांच्या निविदा प्रस्तावाबाबत राज्यस्तरीय तांत्रिक समितीची बैठक नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्यानुसार नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी गजानन आलेवाड यांनी नाशिकसह पुणे, सिल्लोड, अकोला, भंडारा, दौंड, धारणगाव, लोणार, भामरागड, जळगाव, चोपडा, उमरी, आजरा, एरंडोल, परांडा, वेंगुर्ला येथील संबंधित आयुक्त, मुख्याधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंत्यांना बैठकीसाठी बोलाविले आहे.
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गोदावरीसह इतरही उपनद्यांमध्ये मिसळणारे सांडपाणी ड्रेनेजच्या माध्यमातून एसटीपीपर्यंत जाऊन त्यावर प्रक्रिया व्हावी तसेच शहरातील जुन्या मलजल वाहून नेणाऱ्या लाइन मोठ्या क्षमतेच्या व नवीन टाकण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने ८८ किमी लाइन टाकण्यासाठी प्रकल्प हाती घेतला असून, त्यावर २२७ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ५० टक्के निधी अनुदान स्वरूपात मिळणार आहे, तर उर्वरित निधी महापालिकेला खर्च करावा लागणार आहे.