

नाशिक : महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका चार महिन्यांत घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी भाजप, शिवसेना(शिंदे गट) आणि राष्ट्रवादी(अजित पवार गट) महायुती होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी, या तिन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याचीही तयारी ठेवली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी(शरद पवार गट)आणि शिवसेने(ठाकरे गटा)तही एकवाक्यता दिसत नसून, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे पालन करण्याची भूमिका व्यक्त करताना या तिन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात निवडणूक रण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत सर्वाधिक ६६ जागा मिळवत महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकटीकरणावर जोर दिला आहे. मंडलांची फेररचना तसेच कार्यकारिणीची घोषणा लवकरच केली जाणार असून, शहराध्यक्षपद नियुक्तीची प्रक्रियाही सुरू आहे. बूथनिहाय, शक्तिकेंद्रनिहाय बैठकांचे आयोजन केले जात असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सांगितले.
नाशिकचा गड राखण्यासाठी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपले विश्वासू सहकारी राम रेपाळे यांची नाशिकच्या प्रभारीपदी नेमणूक केली आहे. उबाठाला जोरदार धक्का देणाऱ्या शिंदे सेनेने आगामी निवडणुकीत मोठी मजल मारण्याची तयारी केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना बळकटीकरणावर भर दिला जात आहे. स्वबळाचीही तयारी असल्याची माहिती उपनेते अजय बोरस्ते यांनी दिली.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार तयारी केली आहे. पक्ष सदस्य नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, बूथ कमिट्यांच्या स्तरावर बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. महायुतीसाठी पक्ष संघटनेची तयारी असली तरी पक्षनेत्यांच्या निर्णयावरून भूमिका ठरविली जाईल, असे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक येत्या दोन दिवसांत होत आहे. त्यानंतर प्रभागनिहाय, बूथस्तरीय बैठकांचे नियोजन करण्यात येणार असून, संघटना बळकटीकरणासाठी बूथप्रमुखांच्या नियुक्त्या, शाखांचे नूतनीकरण केले जाणार आहे. कोअर कमिटीच्या उपसमित्यांकडून निवडणुकीची व्यूव्हरचना आखली जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी सांगितले.
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जिल्हास्तरीय दौरा आयोजित करण्यात आला आहे. पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे येत्या २५ मे रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होत आहे. येत्या १४ मे रोजी मुंबईत प्रदेश नेत्यांची बैठक होत असून, या बैठकीत निवडणुका स्वबळावर की महायुतीद्वारे यावर विचारविनिमय होऊ शकेल, अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षानेही स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू केली असून, त्यादृष्टीने प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी केली जात असल्याची माहिती शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी दिली. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यादृष्टीने लवकरच पक्षस्तरीय बैठकांचे आयोजन केले जात असल्याचे अॅड. छाजेड यांनी सांगितले.