

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे गुरूवारी(दि.१५) नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
नाशिक हा कधीकाळी मनसेचा गढ होता. राज ठाकरे यांच्या नाशिकच्या नवनिर्माणाच्या सादेला प्रतिसाद देत नाशिककरांनी नाशिक महापालिकेची सत्ता मनसेच्या हाती सोपविली होती. नाशिकमधून मनसेचे तीन आमदारही निवडून दिले होते. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी आणि हेवेदावे यामुळे पक्षाला मोठा फटका बसला. महापालिकेची सत्ता पुन्हा काबीज करण्याचा दावा करणाऱ्या मनसेचे २०१७च्या निवडणुकीत अवघे पाच नगसेवक निवडून आल्याने राज ठाकरे नाराज झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. विधानसभा निवणुकीत मनसेने उमेदवार दिले. परंतू एकही जागा मिळवता आली नाही. विधानसभा निवडणुकांनंतर मात्र मनसेत नवे चैतन्य दिसून आले. प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी विविध आंदोलन करून पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज ठाकरें आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकांसाठी सक्रीय झाले असून त्याची सुरूवात नाशिकमधून करणार आहेत. येत्या गुरूवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस ठाकरे नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत. आगामी निवडणूकांच्या तयारीचा ते आढावा घेणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना टाळी देण्याचे वक्तव्य केल्यानंतर उध्दव ठाकरेंकडूनही प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिक दौऱ्यावर येत असलेले राज ठाकरे या मुद्यावर काय भाष्य करणार याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे. मनसे आणि उबाठाच्या युतीचे नाशिकमधून सुरूवात होणार का, हे आता राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतरच कळू शकणार आहे.