

नाशिक : नाशिक महापालिका आणि नोंदणी मुद्रांक विभागाची आय- सरिता प्रणाली यांच्यात इंटिग्रेशन झाले असून आता नाशिक शहरातील नागरिकीकांना मालमत्ता खरेदी केल्यानंतर लगेचच महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी सदरी नाव लागणार आहे. यासाठी महापालिकेकडे स्वतंत्र अर्ज करण्याची आता गरज नाही.
महापालिका आणि नोंदणी मुद्रांक विभागाची आय-सरिता प्रणालीचे इंटिग्रेशन झाले आहे. महापालिका हद्दीत नवे किंवा जुने घर, दुकान अथवा अन्य मालमत्ता खरेदी केल्यास त्या मालमत्तेवरील मिळकत कर व पाणीपट्टी थेट खरेदीदाराच्या नावावर नोंदवली जाणार आहे. यासाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची किंवा महापालिकेच्या कार्यालयात भेट देण्याची आवशक्यता राहणार नाही. पूर्वी खरेदीदारांना मालमत्ता कर नोंद आपल्या नावावर करण्यासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा लागत होता. त्यात वेळेचा अपव्यय व्हायचा. नोंदणी व मुद्रांक विभाग, महापालिकेच्या या प्रणालीमुळे प्रक्रिया स्वयंचलित करण्यात आली आहे. सदरचा उपक्रम राज्य शासनाच्या डिजिटल गव्हर्नन्स उपक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आय-सरीता प्रणालीशी नाशिकसह राज्यातील पनवेल, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, मिरा-भाईंदर, ठाणे, वसई-विरार, कोल्हापूर, मालेगाव, अहिल्यानगर, भिवंडी-निजामपूर, धुळे, नांदेड-वाघाळा, सांगली-मिरज-कुपवाड, इचलकरंजी या महापालिका जोडल्या आहेत.
अशी आहे प्रक्रिया
आय-सरीता प्रणालीत दस्त नोंदणीच्या वेळी खरेदीदार-विक्रेता माहिती, मालमत्तेची किंमत, मालकी हक्कातील बदलाची माहिती नोंदवली जाते. दस्तनोंदणी पूर्ण झाल्यानंतर ही माहिती महापालिकेला ऑनलाइन पाठवली जाते. त्यानुसार महानगरपालिका कर नोटीस थेट नव्या मालकाच्या नावावर बजावेल. तसेच जुन्या मालमत्तेवरील थकबाकी असल्यास तिची वसुलीही याच प्रणालीद्वारे होईल.
आय-सरीता प्रणालीच्या माध्यमातून मालमत्ता खरेदी केल्यानंतर त्या मालमत्तेवरील मिळकत कर व पाणीपट्टी थेट खरेदीदाराच्या नावावर नोंदवली जाणार आहे.
अजित निकत, उपायुक्त (कर), नाशिक महापालिका