

नाशिक : पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात महापालिका आणि शहर पोलिस आयुक्तालय समन्वयाने काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार, पोलिसांकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले जात असतानाच, महापालिकेकडून शहराला विद्रुपीकरणापासून वाचविण्यासाठी 'मिशन क्लिनअप' हाती घेतले आहे. शनिवारी (दि.११) शहरातील रस्त्यांवर लावलेले भाई, दादांचे होर्डिंग्ज हटविण्यात आले असून, भाई, दादांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी 'ऑन फिल्ड' उतरून 'मिशन क्लिनअप'चे नेतृत्व केले. द्वारका आणि भाभानगरमधील अनधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त करीत, ८२ शेड, ११ टपऱ्या, २९ ओटे तोडण्यात आली. तसेच ३० होर्डिंगही हटविण्यात आले. शहरात जागोजागी भाई, दादांचे होर्डिंग्ज लावून नाशिककरांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रकार केला जात आहे. विशेषत: राजकीय गुन्हेगारांनी याबाबत उच्छाद मांडल्याने, पोलिस आयुक्त शहरातील दादा, भाईंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अनधिृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जात असून, पोलिसांकडून त्यांचा येथेच्छ समाचारही घेतला जात आहे.
आता पोलिसांबरोबरच महापालिकेनेही शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या चार दिवसापासून अनधिकृत अतिक्रमणांवर हातोडा चालविला जात आहे. शनिवारी आयुक्त खत्री, अतिरिक्त आयुक्त झडगे यांच्यासह अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे, संगिता नांदूरकर, अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील वडाळा नाका ते वडाळा गाव चौफुली परिसर, द्वारका आणि भाभानगर परिसरातील अनधिकृत अतिक्रमणावर जेसीबी चालवला. शहरातील रस्त्यांवर अनधिकृतपणे उभारलेली दुकाने, दुकानासमोरील शेड, तसेच टपऱ्या व फलक यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता अतिक्रमण हटविण्याची ही कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या या कारवाईचे नाशिककरांकडून स्वागत केले जात आहे.
यावर चालला हातोडा
शेड - ८२
टपरी -११
ओटे - २०
होल्डिंग - ३०
ज्यांनी अनाधिकृतपणे होर्डिंग्ज लावले आहेत, त्यांनी ते तत्काळ काढून घ्यावेत. तसेच अनाधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, फलकबाजी आदी प्रकार केल्याचे समोर आल्यास, कायदेशीर कारवाई केली जाईल.
मनिषा खत्री, आयुक्त,मनपा