

नाशिक : घरपट्टीच्या थकबाकीचा आकडा ७३६ कोटींवर पोहोचल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा तीव्र केला आहे. पहिल्या टप्प्यात ७४ बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया निश्चित करताना पुढील दोन महिन्यांत प्रत्येक विभागातील १०० याप्रमाणे आणखी 600 बड्या थकबाकीदारांच्या मिळकतींचे लिलाव करण्याचे आदेश आयुक्त खत्री यांनी दिले आहेत.
नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कर सवलत योजना राबविण्यात आली. मात्र त्यानंतरही अनेक करदात्यांनी घरपट्टी भरलेली नाही. त्यामुळे प्रत्येक थकबाकीदाराला महापालिकेच्या करवसुली विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली होती. त्यामध्ये सवलतीने भरावयाचा मालमत्ता कर व माफ होणारा शास्ती, दंड, फी आदी नमूद करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही अनेक मिळकतधारकांनी घरपट्टीचा भरणा केला नाही. अशा मिळकतधारकांना करवसुली कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी समक्ष भेट देऊन, सूचना करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नसल्यामुळे महापालिकेने ४३९ बड्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली. जप्त केलेल्या मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ५० मिळकतधारकांनी प्रतिसाद देत घरपट्टीची थकबाकी भरली. त्यामुळे त्यांच्या मिळकती लिलाव प्रक्रियेतून वगळण्यात आल्या आहेत. उर्वरित ३८७ मिळकतधारकांपैकी पहिल्या टप्प्यात ७४ मिळकतींचे सरकारी मूल्य निश्चित करून, दि. २ ते ४ जुलै या दरम्यान लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. लिलाव प्रक्रियेपूर्वी संपूर्ण थकबाकीचा भरणा केल्यास अशा मिळकती लिलाव प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहेत. दरम्यान, थकबाकीचा वाढता आकडा लक्षात घेता, पुढील दोन महिन्यांत आणखी 600 बड्या थकबाकीदारांच्या मिळकतींचा लिलाव करण्याचे आदेश आयुक्त खत्री यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत दिले आहेत.
थकबाकी वसुलीची मोहीम महापालिकेने तीव्र केली आहे. थकबाकी वसुलीसाठी जप्त मिळकतींचे लिलाव केले जात आहेत. पहिल्या टप्प्यात ७४ मिळकतींचे लिलाव केले जाणार आहेत. आणखी 600 बड्या थकबाकीदारांच्या मिळकतींचे लिलाव करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासकांनी दिले आहेत.
अजित निकत, उपायुक्त(कर), नाशिक महापालिका.