नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीत 'शंभर प्लस'चा नारा दिलेल्या भाजपने रविवारपासून (दि.१४) इच्छुकांच्या मुलाखतींना प्रारंभ केला आहे. पहिल्याच दिवशी चार प्रभागातील तब्बल १५० पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबरच आमदारांनी देखील इच्छुकांशी 'वन टू वन' संवाद साधला आहे.
राज्यातील महापालिकांच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. शहरात भाजपकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी दीड हजारांपेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज पक्ष कार्यालयात दाखल झाल्याने, त्यातून योग्य उमेदवारांची निवड करताना पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. दरम्यान, भाजपने रविवारी इच्छुकांच्या मुलाखतींना प्रारंभ केला असून, पहिल्या दिवशी मध्य विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक ७, १२, १३ आणि १४ मधील १५० पेक्षा जास्त इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यासह आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर सतीश कुलकर्णी, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, प्रा. सुहास फरांदे आदींनी इच्छुकांशी वन टू वन संवाद साधला. भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी का हवी?, तुमचे सामाजिक कार्य काय?, प्रभागाची माहिती आदींबाबतचे प्रश्न इच्छुकांना विचारण्यात आले.
पुढील सहा दिवस मुलाखती घेतल्या जाणार असून, विधानसभा मतदारसंघनिहाय प्रभागातील इच्छुकांशी संवाद साधला जाणार आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीत लढणार की स्वतंत्र असा प्रश्न उपस्थित केला जात असताना, ३१ प्रभागांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात असल्याने, भाजप स्वबळावरच लढेल, अशीही चर्चा रंगत आहे.
इच्छुकांमध्ये धडधड
मुलाखतीसाठी येणाऱ्या इच्छुकांमध्ये कमालिची धाकधुक दिसून आली. विशेषत: महिला इच्छुकांची धडधड वाढली होती. काही महिला इच्छुकांसोबत त्यांचे पती देखील मुलाखतीसाठी उपस्थित होते. काही इच्छुकांनी पक्ष कार्यालयाबरोबर शक्तीप्रदर्शन देखील करण्याचा प्रयत्न केला. मुलाखतींसाठी आमदार मैदानात उतरल्याने, इच्छुकांमध्ये धडधड वाढली आहे. पुढील सहा दिवस मुलाखतींचा कार्यक्रम चालणार आहे.
कुंभमेळा आणि विकासाची कामे लक्षात घेवून सभागृह सक्षम, विचारशील आणि चिंतनशिल असले पाहिजे या अनुषंगाने उमेदवार असावेत, असा विचार कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा आहे. ३१ प्रभागासाठी हजारांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. आम्ही जो शंभर प्लसचा नारा दिला आहे, तो साध्य करण्याच्यादृष्टीने काम सुरू आहे.
लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते, भाजप