

नाशिक : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून महायुती, आघाडी करण्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी १०० प्लसचा नारा देणाऱ्या भाजपकडे सर्वाधिक ९८८ इच्छूकांनी अर्ज दाखल करत उमेदवारीची मागणी केली आहे. या इच्छूकांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या मंगळवार, दि. १६ डिसेंबरपासून भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतींना प्रारंभ होत आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रभागरचना, प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या १५ डिसेंबरला तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २७ डिसेंबरला जाहीर केल्या जाणार आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महापालिकेची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केली जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडूनही जोरदार तयारी सुरू आहे.
१०० प्लसचा नारा देणाऱ्या भाजपने महापालिकेची निवडणूक महायुतीद्वारे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, शिवसेना(शिंदे गट) महानगरप्रमुख प्रविण तिदमे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठकही पार पडली. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सर्वाधिक ९८८ इच्छूकांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून आता १६ ते २० डिसेंबर या दरम्यान या इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
मुलाखतीत चांदा ते बांद्यापर्यंत प्रश्न
या मुलाखतीत चांदा ते बांद्या पर्यंतच्या प्रश्नांचा समावेश असणार आहे. विशेषता महापालिका अधिनियम, उत्पन्न तसेच पक्षाची ध्येय, धोरणांबाबत प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रश्नोत्तराबरोबरचं उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, समाजातील स्थान, प्रतिमा देखील तपासली जाणार आहे. कोअर कमिटीतील जवळपास १२ सदस्य इच्छुकांच्या मुलाखती घेतील. मुलाखतींचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. त्या अनुषंगाने इच्छुकांनी गृहपाठ सुरु केला आहे.