

किशोर सोमवंशी, निफाड (नाशिक)
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर हा सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. तालुक्यात अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल १३ बछडे वेगवेगळ्या गावात आढळून आल्याची नोंद झाली आहे. विशेषतः ही बहुतांश बछडे ऊसतोडणीचे काम सुरू असताना त्यांच्या आईपासून दुरावलेल्या स्थितीत आढळली.
बछड्यांची गावनिहाय आकडेवारी
चितेगाव - १६ नोव्हेंबर - ३
कसबेसुकेणे - २३ नोव्हेंबर - २
तारुखेडले - २६ नोव्हेंबर - ३
कोठुरे - २९ नोव्हेंबर - ३
बिबट्याची बछडे गावात आढळत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. यासह ४ बिबटे जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. या वाढत्या उपद्रवामुळे वनविभागाने तातडीने कठोर पाऊल उचलली आहेत. मानवी वस्तीजवळ धोकादायक ठरलेल्या आणि सातत्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले करणाऱ्या ४ बिबट्यांना एका महिन्यात जेरबंद करण्यात आले आहे.
गावनिहाय पकडलेले बिबटे
देवगाव - ३
रानवड - १
निफाड परिसरात ऊसाच्या शेतात बिबट्यांचा वावर वाढला आहे. उसतोडणी दरम्यान पिल्ले आढळल्यास मादी आक्रमक होण्याची शक्यता असते. आढळलेल्या १३ बछड्यांना सुरक्षितपणे आईकडे सोडले आहे. नागरिकांनी यापुढे बछडे किंवा बिबटे आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधत सहकार्य करावे.
राहुल घुगे, वनपरिक्षेत्र अधिकारी
10 गावांत लावले पिंजरे
बिबट्यांचा वाढता उपद्रव आणि मानव - वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने निफाड तालुक्यातील १० संवेदनशील गावामध्ये पिंजरे लावले आहेत. बिबट्यांचा वावर जास्त असलेल्या आणि पिल्ले आढळलेल्या परिसरात हे तातडीचे पाऊल उचलण्यात आले आहे. देवगाव, तारुखेडले, खेडलेझुंगे, वनसगाव, महाजनपूर, धारणगाववीर, चांदोरी, चितेगाव, सारोळेथडी, गोंडेगाव या गावांत पिंजरे लावण्यात आली आहे.