

निफाड (नाशिक) : नगरपंचायतीने शहरात नायलॉन मांजा आणि प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत बंदी असलेल्या १० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना चाप बसला आहे.
नायलॉन मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने यावर बंदी घातली आहे. या आदेशाची अंमलबजावणीसाठी निफाड नगरपंचायतीने पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी (दि. २६) बाजारपेठेच्या मुख्य दिवशी नगरपंचायतीच्या पथकाने शहरातील माकड बाबा चौक, अकोल खास गल्ली आणि मुख्य बाजारपेठेतील दुकानांची झडती घेतली. यावेळी नियमांचे उल्लंघन करून विक्रीसाठी ठेवलेले मांजाचे रिळ जप्त केले, तसेच १० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या. नगरपंचायतीचे अधिकारी शरद बोडके, अनिल गंदमवाड, जयसिंग ठाकरे, मुकुंद शिंदे, विनोद त्रिभुवन आदींनी ही कारवाई केली.