

लासलगाव:
उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही जाणवू लागला असून, नाशिक जिल्ह्यासह निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. विशेष म्हणजे, थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही निफाडचे तापमान खाली घसरले असून, सोमवार (दि. १६) रोजी निफाडमध्ये किमान ११.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात धुळ्यानंतर निफाड सर्वाधिक थंड ठरल्याने नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. दिवाळी संपताच तालुक्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली असून, पहाटे आणि सकाळच्या वेळी हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे. वाढत्या गारठ्यामुळे नागरिकांनी आता उबदार कपड्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.
विशेषतः मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक आणि कामानिमित्त पहाटे घराबाहेर पडणाऱ्यांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात सकाळच्या वेळी धुकट वातावरणासह गार वारे वाहत आहेत.
सकाळी बोचरा गारवा, तर दुपारी कडक उन्हाचा चटका, असे दुहेरी हवामान सध्या अनुभवायला मिळत आहे. तापमानातील या मोठ्या चढ-उतारामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घशात खवखव यांसारख्या आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.
या बदलत्या हवामानात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉ. स्वप्नील जैन यांनी दिला आहे.निफाड तालुका हा द्राक्ष आणि कांदा उत्पादनासाठी महत्त्वाचा पट्टा असल्याने तापमानातील बदलांकडे बळीराजाचेही लक्ष लागले आहे.
वाढत्या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्षबागांवर काय परिणाम होतो, याबाबत शेतकरी सतर्क झाले आहेत. दिवाळीनंतर सुरू झालेली ही गुलाबी थंडी आता हळूहळू कडाक्याच्या हिवाळ्याची चाहूल देत असून, आगामी काळात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक आणि शेतकरी दोघेही हवामानावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.