NIMA Nashik | ना फायर एक्झिट, ना ड्रेनेज लाइन; छतावरून टाकली पाइपलाइन

नाशिक : फ्लॅटेड बिल्डिंगमधील समस्यांविषयी एमआयडीसी अधिकाऱ्यांना जाब विचारताना धनंजय बेळे. समवेत निमा पदाधिकारी व बिल्डिंगमधील सभासद.
नाशिक : फ्लॅटेड बिल्डिंगमधील समस्यांविषयी एमआयडीसी अधिकाऱ्यांना जाब विचारताना धनंजय बेळे. समवेत निमा पदाधिकारी व बिल्डिंगमधील सभासद.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आतापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन अंडरग्राउंड टाकली जात असल्याचे आपण बघून, ऐकून आहोत. मात्र, सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट न. २८ वर एमआयडीसीने उभारलेल्या फ्लॅटेड बिल्डिंगमध्ये चक्क छतावरून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथील उद्योजकांना दिवसभर गरम पाण्याचा पुरवठा होतो. याशिवाय बिल्डिंगमध्ये कुठेही फायर एक्झिटची सोय नाही. रस्तेही खराब असून, ड्रेनेज लाइनचा पत्ताच नसल्याने उद्योजकांची मोठी गैरसोय होत आहे.

१९९९ ते २००० मध्ये उभारण्यात आलेल्या या तीन मजलींच्या पाच इमारतींमध्ये १६८ गाळे आहेत. मात्र, याठिकाणी सुविधांची प्रचंड वाणवा आहे. रस्त्यांची प्रचंड दुरवस्था असून, ड्रेनेज लाइन टाकण्यात आलेली नाही. पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन चक्क छतावरून टाकल्याने गाळ्यांमध्ये असलेल्या नळांना दिवसभर गरम पाण्याचा पुरवठा होतो. याशिवाय एकाही इमारतीत लिफ्ट नसल्याने मटेरिअलची ने-आण करताना उद्योजकांना मोठी कसरत करावी लागते. बिल्डिंगला संरक्षक भिंत नसल्याने, भुरट्या चोरांचा जाच कायम आहे. दरम्यान, या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी निमा पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत गुरुवारी (दि. ८) बैठक घेतली.

निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी एमआयडीसीच्या या उरफट्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले असता, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांजेदेखील अवाक झाले. यावेळी बिल्डिंगमधील सर्व सभासदांना फायनल लीज डीड करण्याचा मुद्दा चर्चिला गेला असता, एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक साळी यांनी सर्व प्रक्रिया पार पाडणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच सोसायटी हस्तांतरणापूर्वी वरील सर्व कामे पूर्ण करून प्लॉट सुस्थितीत सोसायटीकडे हस्तांतरित करण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे सभासदांनी सांगितले असता, कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे आणि उपअभियंता नितीन पाटील यांनी यात लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. यावेळी निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, मनीष रावल, हेमंत खोंड, राजेंद्र वडनेरे, अखिल राठी, कैलास पाटील, प्लॉट नं २८ मधील नितीन आव्हाड, नितीन साळुंके आदी उपस्थित होते.

पाचवी इमारत अनधिकृत
सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट न. २८ वर १९९९ मध्ये अगोदर दोनमजली चार इमारती उभारण्यात आल्या होत्या. या इमारतींना प्रशस्त पार्किंगची जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र, २००० मध्ये याच पार्किंगच्या जागेवर अनधिकृतपणे तीनमजली पाचवी इमारत उभारली गेल्याने, येथून उद्योजकांना पार्किंगचा प्रचंड त्रास भेडसावत आहे. यावर धनंजय बेळे यांनी बोट ठेवले असता, एमआयडीसी अधिकारी अबोल झाले.

सोमवार,दि.12 रोजी पाहणी
बिल्डिंगमधील समस्यांची येत्या सोमवारी (दि.१२) एमआयडीसीचे उपअभियंता नितीन पाटील, निमा पदाधिकारी व फ्लॅटेड बिल्डिंगमधील सदस्य यांची सयुक्त समिती पाहणी करणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी एस्टिमेट बनवून ही कामे मार्गी लावले जाणार असल्याचे आश्वासन बाळासाहेब झांजे यांनी दिले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news