

नाशिक : अंजली राऊत
जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची संख्या शेकडोहून अधिक आहे. इमानेइतबारे व्यवसाय करणारा हा घटक मात्र तसा उपेक्षितच राहिला आहे. संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यासाठी त्यांनी सरकार दरबारी पाठपुरावा केला आणि त्याला नुकतेच यशही आले आहे. काही जणांची दुसरी, तिसरी पिढी वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात काम करत आहेत. वडील, मुलगा आणि नातवंडे असे तीन पिढ्या असणारे काहीजण या व्यवसायात उतरले आहेत. मात्र वृत्तपत्र विक्रेत्यांचा हा कष्टाचा, अभिमानाचा दिवस सन्मानाचा व्हावा अशी अपेक्षा होत आहे.
मोठे कुटुंब असल्यामुळे छोट्या अब्दुलला देखील काहीतरी उद्योग करावा असे वाटत होते. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्र वाटण्याचे काम सुरु केले. मात्र त्यासाठी त्यांनी शिक्षण सोडले तर नाहीच पण त्याकडे दुर्लक्ष देखील केले नाही. रात्री कंदिलाच्या उजेडात अभ्यास करुन सकाळी ते घरोघर वृत्तपत्र वाटण्याचे काम करत असायचे. या मिसाईल मॅनच्या कष्टाप्रती कृतज्ञतेचा दिवस म्हणजेच 'वृत्तपत्र विक्रेता दिन' साजरा केला जात आहे.
हे छोटे अब्दुल म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम होय. त्यांनी घरोघरी वृत्तपत्र वाटून वाचनाची गोडी लावली. त्यामुळे त्यांना कृतज्ञता व्यक्त व्हावी या उद्देशाने त्यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा संपूर्ण महाराष्ट्रात वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जात आहे. 15 ऑक्टोबर 2018 मध्ये नांदेड येथे खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते या दिनाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने वृत्तपत्र विक्रेता दिन देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी करण्याचे ठरवले. त्यानुसार वृत्तपत्र विक्रेता दिन हळूहळू संपूर्ण देशभर साजरा होत असल्याचे दिसून येत आहे.
वृत्तपत्र विक्रेत्याला मिळणारा मान, पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठून वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. त्यानंतर पायी, सायकलवरुन किंवा मिळेल त्या वाहनाने घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे कष्ट पाहून आणि मोबदल्यात मिळणारे अल्पसे मानधन यामुळे नवीन पिढी सहसा वृत्तपत्र विक्रेता व्यवसायाकडे पाठ फिरवत आहेत.
राज्य शासनाने वृत्तपत्र विक्रेताला मान देऊन त्यांचा सन्मान केला आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी महामंडळ व्हावे, यासाठी गेल्या १४ वर्षांपासून लढा सुरू होता. त्यामुळे राज्य सरकारने महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल शासनाचे अभिनंदन करतो व आभार मानतो. त्यामुळे विक्रेत्यांच्या आयुष्यात दिवाळी साजरी होणार आहे. वृत्तपत्र विक्रेता हा व्यवसाय असा आहे की, यामध्ये पूर्ण जबाबदारीने घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचे काम विक्रेत्याला एकट्यालाच करावे लागते. त्यामुळे इतर कामगारांना ज्याप्रमाणे महामंडळातून लाभ मिळतो, त्या धर्तीवर वृत्तपत्र विक्रेत्यांना देखील सर्वांगीण लाभ मिळावा, अशी अपेक्षा आहे. त्यांना देखील एखादा पुरस्कार जाहीर करावा.
महेश कुलथे, वृत्तपत्र विक्रेता, जेलरोड
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा कष्टाचा गौरव करणारा, अभिमानाचा दिन आहे. वृत्तपत्र विक्रेत्याला समाजात सन्मान मिळावा.
किशोर सोनवणे, वृत्तपत्र विक्रेता, जेलरोड.