नाशिकच्या पठ्ठ्याने पाडला चौकार -षटकारांचा पाऊस, ऑस्ट्रोलियाला चारली धूळ

Sahil Parakh India U19 squad against Australia U19 | दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा दणदणीत विजय
Sahil Parakh India U19 squad against Australia U19
साहिल पारख Pudhari Photo
Published on
Updated on

Sahil Parakh India U19 squad against Australia U19 | नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत केवळ ७५ चेंडूत १४ चौकार व तब्बल ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावत भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला. यामुळे भारतीय संघाने आता तीन सामन्याच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

साहिल पारख भारतीय संघातर्फे १९ वर्षांखालील वयोगटात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिका खेळत आहे. पुदुचेरी येथे २१ ते २६ सप्टेंबर दरम्यान १९ वर्षांखालील भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होत आहे. पहिल्या सामन्यात साहिल पारखने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौकार मारून पदार्पण केले पण लगेचच ४ धावांवर बाद झाला होता. मात्र दुसऱ्याच सामन्यात त्याची जोरदार भरपाई नाबाद घणाघाती आक्रमक फटकेबाज शतक झळकवून केली. साहिलने आज केवळ ४१ चेंडूतच अर्धशतक झळकवले ( ५ चौकार व ३ षटकार ) आणि त्यापुढील फक्त ३४ चेंडूत ५६ धावा फटकावत हा अवघ्या नाशिकचा लाडका सुपुत्र १०९ धावांवर ( एकूण १४ चौकार व ५ षटकार ) नाबाद राहिला. साहिलच्या फलंदाजीचा स्ट्राईक रेट १४५.३३. इतका राहिला.

त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद १७६ धावा केल्या. महाराष्ट्राच्या किरण चोरमळेच्या गोलंदाजीवर साहिलने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा झेल घेतला व त्यास १५ धावांवरच तंबूत पाठवले. किरण चोरमळेसह, समर्थ एन व मोहम्मद इनाननेही प्रत्येकी २ बळी घेतले. विजयासाठी १७७ धावांचा पाठलाग करतांना साहिलने रुद्र पटेल बरोबर ३ षटकातच २४ धावांची सलामी दिली. रुद्र पटेल १० धावांवर बाद झाला. त्यांनतर साहिलने अभिग्यान कुंडू सह पुढील केवळ १९ षटकांत जोरदार नाबाद १५३ ची विजयी भागीदारी केली. षटकामागे ८ धावांच्या सरासरीने केलेल्या आक्रमक फलंदाजी समोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी नांगी टाकली. १५ षटकातच १२० धावा फलकावर लागल्या त्यात साहिलच्या धावा होत्या ४४ चेंडूत ६३. भारताचा यष्टीरक्षक अभिग्यान कुंडूने साहीलला सुरेख साथ देत ५० चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या.

तिसरा एकदिवसीय सामना २६ सप्टेंबरला

नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे सर्व नाशिककरांचे स्वप्न साकार झाले आहे व समस्त क्रीडा रसिकांना पुढील सामन्यातच नव्हे तर भविष्यात देखील साहिल पारख कडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. तिसरा एकदिवसीय सामना २६ सप्टेंबरला आहे.

नाशिककरांना अभिमान, आनंदाचे वातावरण

भारतीय संघातील साहिलच्या या अफलातून कामगिरीने नाशिकच्या क्रीडा वर्तुळात, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्ह्यातील सर्व क्रिकेट खेळाडूंत, क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे, जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी व सदस्य व संघ प्रशिक्षक या सर्वांनीच नाबाद शतकवीर साहिलचे खास अभिनंदन करून स्पर्धेतील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news