

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अर्थात बिटको रुग्णालयातील विविध विभागांमध्ये मनुष्यबळाची प्रचंड कमतरता असल्याने, त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत असल्याने, रुग्णांवरदेखील योग्य उपचार होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णालयात तात्काळ पदे भरण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
रुग्णालयातील विविध विभागांमध्ये आवश्यक कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णसेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, कर्मचारी बदल्या, रिक्त पदे आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
रुग्णालयात निर्धारित निकषांनुसार आवश्यक नर्सिंग कर्मचारी उपलब्ध नाहीत. तसेच आयसीयू आणि वॉर्डांमध्ये आवश्यक प्रमाणात स्टाफ नसल्यामुळे कमी कर्मचाऱ्यांकडून अधिक रुग्णांची सेवा दिली जात आहे. याशिवाय, बालरुग्ण विभागातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता स्वतंत्र वॉर्ड आणि पुरेशा कर्मचाऱ्यांची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
ईसीजी तंत्रज्ञ, केस पेपर लिपिक, लिफ्ट ऑपरेटर, क्लार्क, ऑफिस बॉय आणि सुरक्षा रक्षक यांसारख्या सहाय्यक कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. रुग्णालय परिसरात पोलिस चौकी कार्यरत नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होत आहेत.
रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी गर्दी लक्षात घेता, अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इंटरकॉम सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या आणि आगामी आरोग्यसेवेच्या गरजा लक्षात घेता आवश्यक मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
बिटको रुग्णालय मनुष्यबळ अभावी आजारी स्थितीत आहे. मनुष्यबळासह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. महापालिका आयुक्त, महापौर यांना यापूर्वी निवेदने दिली आहेत. त्यानुसार, सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात.
- जगदीश पवार, माजी नगरसेवक