नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी बुधवारी (दि.१२) प्राथमिक शिक्षण विभागात अचानक भेट दिली. या अचानक पाहणीत वेळेचे भान न ठेवता गैरहजर राहणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन कापण्याचे थेट निर्देश पवार यांनी यावेळी सामान्य प्रशासनाला दिले. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
ओमकार पवार यांनी बुधवारी सकाळी अचानक शिक्षण विभागात भेट देत, हजेरीपटाची झाडाझडती घेतली. लेटलतीफ आणि बेजबाबदार कर्मचाऱ्यांना कोणताही दिलासा न देता प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना तात्काळ ९ जणांचे वेतन कापण्याचे आदेश दिले.
'सरकारी काम अन् सहा महिने थांब' ही वृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दमच त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला. या दणक्यानंतर त्यांनी थेट शाळा दुरुस्तीच्या संथ कारभारावरून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, धोकादायक वर्गखोल्या तातडीने बंद करून पर्यायी व्यवस्था उभारा, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव धुळ खात न ठेवता प्रशासकीय मंजुरी गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
एकीकडे कामचुकारांना चाबूक मारतानाच, पवारांनी प्रामाणिक प्रक्रियेला गति दिली. प्रतीक्षा यादीत अडकलेल्या ८ शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. विशेष म्हणजे, प्रशासनाची चक्रे वेगाने फिरवत त्याच दिवशी सायंकाळी या सर्व शिक्षकांच्या हाती पदोन्नतीचे आदेश सोपविले. एकाच दिवसात कारवाई आणि कामाचा तडाखा दाखवत पवार यांनी शिक्षण विभागाचा कारभार समोर आणला.