नाशिक : गत आठवड्यात वाजत-गाजत उद्घाटन झालेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतून सोमवारी (दि.17) पासून कामकाजाला सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह त्यांच्याशी निगडीत विभाग हे इमारतीत स्थलांतरीत झाले असून त्यांनी कामकाज सुरू केले आहे. पहिला दिवस हा आवराआवरीतच गेला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे थाटात उद्घाटन झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने सोमवारी शासकीय कामाचा पहिला दिवस होता. शनिवारी व रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी विभागांना स्थलांतर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभागानी स्थलातंर केले आहे. जुन्या इमारतीतून नवीन इमारतीमध्ये 'शिफ्ट'होताना फाईल्सचे गठ्ठे बांधून आणले आहेत. त्यात कुठली फाईल कोणत्या गठ्यात बांधली, याचा अचूक अंदाज कर्मचाऱ्यांना येत नसल्याने फाईल चटकन सापडत नसल्याचा अनुभव येत आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालय अधीक्षकांना बसण्यासाठी जागा मिळालेली नाही. त्यांचा जागेचा शोध सुरू आहे. कर्मचाऱ्यांची आसन व्यवस्था करताना एकमेकांसमोर बसले आहेत. मात्र, अर्ध्या कर्मचाऱ्यांची पाठ विभाग प्रमुखांकडे येते. यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याने त्यांना काम करताना अवघडल्यासारखे वाटते, अशी महिला कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या आहे. त्यांनी संबंधित विभागाकडे याविषयी बदल करावा, अशी मागणीही केली. परंतु, आता आसन व्यवस्थेत बदल करणे शक्य नसल्याचे संबंधित कंत्राटदाराकडून सांगण्यात आला. इमारतीतील तीन मजल्यांचे काम सुरू असल्यामुळे आरोग्य विभाग, कृषी व बांधकाम विभाग 'शिफ्ट' झालेले नाहीत. आरोग्य विभाग लवकरच स्थलांतरीत होणार आहे. त्यांनंतर अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी निगडीत विभाग स्थलांतरीत होतील, असे नियोजन आहे.
जुन्या इमारतीत शुकशुकाट
जि.प.चे बहुतांश विभाग नवीन प्रशासकीय इमारतीत गेल्यामुळे जुन्या इमारतीकडील वर्दळ काहीशी कमी झाली होती. विभागांनी स्थलांतर केल्याने अनेक विभागांना टाळे लावण्यात आले त्यामुळे तेथे शुकशुकाट दिसत होता. अभ्यंगतांना नवीन इमारतीची सवय होईपर्यंत गर्दी कमीच राहील असा अंदाज आहे. जिल्हा परिषदेचे विभाग दोन ठिकाणी विभक्त झाल्याने कामानिमित्त येणा-या व्यक्तींही विभागून जातात.
पहिल्याच दिवशी पाणी टंचाई
नवीन प्रशासकीय इमारतीत विभागांचे स्थलांतर होऊन कामकाज सुरू झाले. मात्र, पहिल्याच दिवशी इमारतीतील पाण्याची मोटर जळाली. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायंकाळी पाणी टंचाईचा सामना करावा लागला. इमारती बाहेर जनरल स्टोअर्स नसल्याने छोट-छोटया वस्तू घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना शहरात यावे लागले.