

येवला : तालुक्यातील कातरणी येथे ट्रॅक्टरचलित ब्लोअरमध्ये केस अडकल्याने महिलेचे केस अडकल्याने गंभीर जखमी झाली. तिला प्रथम मनमाड व नंतर येवला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना तिचे निधन झाले.
कातरणी येथे रविवारी ( दि.७ ) दुपारच्या सुमारास कांदा पिकावर औषध फवारणी करत असताना टाकीतील पाणी संपल्याने माधुरी दीपक सोनवणे टाकीत पाणी टाकण्यास गेली होती. ट्रॅक्टरचलीत ब्लोअरमध्ये केस अडकल्याने ती ब्लोअरच्या मशीनमध्ये ओढली जाऊन गंभीर जखमी झाली.
नातेवाईकांनी तिला तत्काळ मनमाड येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यांना दोन मुली असून मोठी मुलगी तीन तर दुसरी दीड वर्षाची आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून रात्री उशिरा कातरणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. येवला तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.