

आसिफ सय्यद, नाशिक
शहरातील २.१० लाखांपैकी १.४२ लाख नळ जोडण्यांवरील जलमापक सदोष असून, ३७ हजार नळ जोडण्यांबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याची धक्कादायक माहिती महापालिकेने खासगी मक्तेदारामार्फत केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होत असल्याचे आणि हिशेबबाह्य पाणीवापर होत असल्याचे सिद्ध झाले आहे. जलमापक सदोष आढळलेल्या नळजोडणी धारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून, पाणीपट्टी आकारणी प्रक्रिया सुरळीत केली जाणार आहे.
पाणीपुरवठा यंत्रणेवर होणारा खर्च आणि पाणीपट्टीतून वसूल होणारा महसूल यात मोठी तफावत असल्यामुळे महापालिकेला पाणीपुरवठा व्यवस्थेतून दरवर्षी ३५ ते ४० कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. महापालिकेने आठ वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात ४० टक्के पाणीवापर 'हिशेबबाह्य' असल्याचे आढळून आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीगळती, पाणीचोरी होत असल्याच्या आरोपांना पुष्टी मिळाली होती.
पाणीपट्टी देयके वाटपासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे पाणीपट्टीच्या थकबाकीचा डोंगर १७५ कोटींवर गेला आहे. त्यामुळे पाणीपट्टीच्या देयक वाटपाबरोबरच अनधिकृत नळजोडण्या शोधण्यासाठी महापालिकेने पुण्यातील क्रॅनबेरी या खासगी मक्तेदाराची नियुक्ती केली. या मक्तेदारामार्फत नोव्हेंबर २०२४ पासून शहरातील नळ जोडण्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. या सर्वेक्षणाचा अहवाल महापालिकेच्या करवसुली विभागाला सादर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात शहरातील दोन लाख १० हजार ८६८ नळ जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात केवळ ६८ हजार ९०१ नळजोडण्यांवरील जलमापक नियमानुसार सुस्थितीत आढळले. एक लाख ४१ हजार ९६७ जलमापक विविध कारणांमुळे सदोष असल्याचे आढळले. महापालिकेकडून संबंधित नळजोडणीधारकांना नोटिसा बजावून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
असे झाले नळजोडण्यांचे सर्वेक्षण
सर्वेक्षणासाठी मक्तेदारांच्या कर्मचाऱ्यांची विभागनिहाय सर्वेक्षण पथके तयार करण्यात आली होती. पथकात चार कर्मचाऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक पथकावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या करवसुली विभागातील निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकांमार्फत घरोघरी जाऊन नळजोडण्यांची तपासणी करण्यात आली. नळजोडणीधारकांची संपूर्ण माहिती, मोबाइल क्रमांकासह नळजोडणी आकाराची मंजुरी, प्रत्यक्ष आढळलेली नळजोडणीची तपासणी करण्यात आली.
३७ हजार नळजोडण्या गायब
महापालिकेच्या पथकाने घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ३७ हजार नळजोडण्याधारकांकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. या नळजोडणीधारकांची कुठलीही माहितीदेखील मिळू शकली नाही. १२ हजार ५२६ नळजोडण्या जलमापकाविना असल्याचे आढळले. त्यामुळे पाणीचोरी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
काय आढळले सर्वेक्षणात
२,१०,८६८ नळजोडण्यांपैकी जलमापक सुस्थितीत - ६८,९०१
रीडिंग दिसत नसलेले जलमापक - १९,५१९
नियमबाह्यरीत्या जमिनीखाली असलेले जलमापक - २०,६०६
बंद स्थितीत आढळलेले जलमापक - १५,१२४
जलमापक नसलेले नळकनेक्शन - १२,५२६
फोटो घेता येत नसलेले - १३,४०९
घर बंदस्थितीत आढळलेले - १६,४८१
अवजड चेंबरखाली असलेले जलमापक- ३,८८७
नळजोडणी खंडित असलेले- १,८७०
मीटर चोरीला गेलेले - १२०१
रिव्हाइज जलमापक- ३२८
तात्पुरते बंद स्थितीत- १६
प्रतिसाद नसलेले - ३७,०००
पाणीपट्टीची देयके नळजोडणीधारकांना वेळेवर उपलब्ध होण्यासाठी खासगी मक्तेदारावर देयक वाटपाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांमार्फत शहरात नळजोडण्यांची तपासणी करण्यात आली. जलमापक बंद अथवा नादुरुस्त असलेल्या नळजोडणीधारकांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाई केली जाईल. सर्व नळजोडण्यांना नियमित देयके वाटप करून पाणीपट्टीचा महसूल वाढवला जाईल.
अजित निकत, उपायुक्त, कर विभाग मनपा, नाशिक.