

नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त अशोका ग्रुप ऑफ स्कूलतर्फे शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे दोनदिवसीय प्रदर्शन सिटी सेंटर मॉल येथे भरविण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कलाकार रूवी नारंग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या रेणुका जोशी उपस्थित होत्या. अशोका आर्टफेस्ट प्रदर्शनाचे आठवे वर्ष असून, विद्यार्थ्यांनी केलेल्या काष्ठशिल्प, वाळूशिल्प, सिरॅमिक पाॅटरी, कॅलिग्राफी आदी कलाकुसरींच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केली जाते व जमा रक्कम सेवाभावी संस्थांना दान केली जाते. सॅण्ड आर्ट शोद्वारे गोदावरी स्वच्छता जागरूकता अभियान लोकांपर्यंत पोहोचविण्याची संकल्पना हे मुख्य ध्येय असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या प्रदर्शनात वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्पासारख्या सेवाभावी संस्थांनीही आपली उत्पादने ठेवली आहेत. प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन अशोका ग्रुपचे दिनेश सबनीस यांनी केले आहे.