नाशिक : कधी इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीतील ममी, मृत्युदेवता, पाप- पुण्याच्या कल्पनांचे प्रतीक हातातील तराजूतून 'मूर्तिमंत' होतात, तर कधी आध्यात्म, ध्यान यांचे 'रंग' कलाकृतीत उमटतात. भीतीवर मात करून जगणे 'निर्भय' व 'अमर्त्य' करते, तर कधी गोपीकृष्णाचे गायीवरील प्रेम, भूतदया चित्रातून उमटतात. मनुष्य भौतिक सुखाचा त्याग करून वैराग्य पत्करून मोह- मायावर कसा विजय मिळवतो, यावर भाष्य करणारे रचनाचित्र संवाद साधु लागते. या आणि अशाच विविध संकल्पना, आशय आणि विचारांनी, रंगांनी सजलेल्या अभिनव, सर्जनशील चित्र- शिल्प कृतींनी सजलेल्या प्रदर्शनाला रसिकांची दाद मिळत आहे.
क. क. वाघ ललित कला महाविद्यालयाचे वार्षिक कलाप्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकातील 'छंदोमयी' कलादालनात सुरू आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षणक्रमात तयार केलेल्या 100 हून अधिक चित्र- शिल्प कृती मांडण्यात आल्या आहेत. अनुराग दुसानेचे कंपोझिशनमध्ये भाैतिक सुखाचा त्याग करून वैराग्याकडे झुकण्याच्या मानवी वृत्तीवर भाष्य करते. कीर्ती माळीचेे अर्धनारी नटेश्वर स्त्री- पुरुष समानतेचा संदेश देते. श्रीराम चौधरीच्या रचनाचित्रातून श्रीकृष्णाचे गायीवरील प्रेम, भूतदया आणि गोपिका यांवर भाष्य केले आहे. त्यातील अफलातून रंगसंगतीतून पाहताक्षणी मोहिनी घालते.
प्रदर्शनातील शिल्पकृतीही अर्थपूर्ण आहेत. ओंकार रेडगावकरचे मानवी कवटीवर पाय ठेवलेल्या हरिणीने भीतीवर विजय मिळवला असून आता ती निर्भय जगते असा संदेश 'अघोर' या शिल्पातून देेते. अनुराग दुसानेच्या रचनाकृतीत वैराग्यावर भाष्य करण्यात आले आहे. यासह प्रदर्शनात तारेपासून निर्मित नर्तकी, बारशिंगी काळवीट, हरीण यांच्या कलाकृती लक्षवेधी ठरतात.
चित्रप्रदर्शनात कंपोझिशन, निर्सगचित्रे, व्यक्तिचित्र, वस्तुचित्रांसह, कैलास शिल्प, अनावृत्त शिल्प, टाकाऊतून टिकाऊ यासह विविध माध्यमातील कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रदर्शनाचे उद्घाटन के. के. वाघ संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी के. के. वाघ सरस्वतीनगर कॅम्पसचे समन्वयक डॉ. व्ही. एस. सेवलीकर, ललित कला विभागाचे अधिष्ठाता बाळ नगरकर, प्राचार्य सचिन जाधव उपस्थित होते.